आहारातील घटक महत्त्वाचे आहेतच, पण आहार घेण्याच्या वेळाही महत्त्वाच्या
वेळा पाळण्यानं पोषणापासून आरोग्यापर्यंत अनेक गोष्टी साध्य
महाराष्ट्र : आपण घेत असलेल्या आहारामधले घटक जितके महत्त्वाचे असतात, तितक्याच महत्त्वाच्या असतात आहार घेण्याच्या वेळा. केवळ वेळा पाळण्यानं पोषणापासून आरोग्यापर्यंत अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात. या वेळा कशा पाळायच्या, कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या याबाबतचे मंत्र लक्षात ठेवू.
सकाळचा नाश्ता
सकाळी नाश्ता भरपेट करा. सकाळचा हा नाश्ता जितका वेळेत असेल आणि त्यात वैविध्य असेल, तितका तुमचा दिवस ऊर्जादायी आणि आनंददायी जातो. सकाळी उठल्या उठल्या चहा पिण्याआधी नाश्ता करा आणि नंतर चहा, कॉफीसारख्या पेयांचा आस्वाद घ्या.
नाश्त्यामध्ये पोहे, उप्पीट, थालीपीठे, आंबोळ्या असे पारंपरिक पदार्थ असल्यास जास्त उत्तम. नाश्त्याबरोबर एखादे फळही नक्की खा. किंबहुना सकाळी उठल्यानंतर एखादे फळ खाऊन नंतर नाश्ता असा क्रम ठेवल्यासही उपयुक्त ठरू शकतं. एक मात्र खरं, की सकाळी उठल्यानंतर नाश्त्यापर्यंत फार वेळ घालवू नका.
दुपारचं जेवण
नाश्त्याइतक्याच दुपारच्या जेवणाच्या वेळा पाळणं फार गरजेचं असतं. आपल्या शरीरात पचनविषयक स्राव हे विशिष्ट काळापर्यंतच जास्त वेगानं पाझरत असतात. त्यामुळे त्यांचा योग्य उपयोग होण्यासाठी सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण हे वेळेत असलं पाहिजे.
दुपारचं जेवण फार लांबवलं, तर नंतर पित्ताचा त्रास होऊ शकतो. दुपारच्या जेवणात ताकासारख्या घटकांचा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन नक्की समावेश करा.
सायंकाळचे स्नॅक्स
दुपारच्या जेवणानंतर आपण एकदम रात्री जेवत असल्यानं मधल्या वेळेत काही तरी नक्की खाल्ले पाहिजे. स्नॅक्समधला छोटासा पदार्थ, फळं अशा गोष्टी नक्की खा. सायंकाळी फक्त चहा पिल्यास त्याचा चांगला परिणाम होत नाही.
रात्रीचं जेवण
रात्रीचं जेवण हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा भाग असतो. अनेक जण रात्री खूप उशिरा आणि जास्त जेवतात. त्यामुळे ते अन्न अंगी लागत नाही आणि शरीरावर एक प्रकारचा ताण येतो. रात्रीचं जेवण झोपेच्या वेळेच्या आधी किमान दोन तास तरी असलं पाहिजे. त्यामुळे हे जेवण झाल्यावर शरीराला ते पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. हे जेवणही डाळखिचडी, भात, सूप्स असं किमान असावं.
रात्री जेवल्यानंतर लगेच झोपू नका. त्यामुळे आपल्या शरीराला विश्रांती मिळत नाही. झोपेतही अन्न पचवण्याचं काम शरीराच्या यंत्रणेला करावं लागतं आणि त्यामुळे आहारातले घटक पोषणासाठी उपयोगी पडत नाहीत. आदल्या दिवशी रात्री उशिरा जेवल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी आळसावल्यासारखे वाटते हे तुम्हीही अनेकदा अनुभवले असेल.