देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका; म्हणाले, “राज्यातील शेतकऱ्यांना वाली नाही, आम्ही सत्तेत असताना…”
![“माझं स्पष्ट मत आहे की मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या मान्यतेशिवाय हे…”, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/Devendra-Fadanvis-1.jpg)
मुंबई |
आम्ही सत्तेत असताना अतिवृष्टी आणि पुराने प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना प्रति जिल्हा ५०० कोटी रुपयांची मदत दिली होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता राज्यातील शेतकऱ्यांना वालीच नसल्याचं दिसून येतंय, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नांदेडमध्ये केलं. फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्यातील पुराचा आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागाची पाहणी केली. ”पावसामुळे जमीन वाहून गेली आहे आणि पिके नष्ट झाली आहेत. आम्ही सत्तेत असताना आम्ही प्रति जिल्हा ४००-५०० कोटी रुपयांचा पीक विमा द्यायचो. पण आता परिस्थिती अशी आहे, की शेतकऱ्यांना कोणी वाली नाही. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले नाहीत, विम्याद्वारे कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. तसेच शेतातील वीज जोडणी देखील अद्याप सुरू करण्यात आली नाही,” असं फडणवीस म्हणाले.
पूर्वीच्या भाजपा सरकारच्या नेतृत्वाखालील जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत केलेली कामे या क्षेत्रातील पुरासाठी जबाबदार असल्याचा दावा काही तज्ज्ञांनी केला होता. यासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले की, “हे दावे खोटे असून त्यांचा एकमेव हेतू भाजपाविरोधात राजकारण करणे आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली होती. तज्ज्ञांनी जलयुक्त शिवार योजनेचे फायदे तेव्हा उच्च न्यायालयाला समजावून सांगितले होते,” असं फडणवीसांनी लातुरात बोलताना म्हटलं होतं. दरम्यान, ”शेतकरी आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. राज्य सरकारने दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत जमा करावी अन्यथा भाजपा आंदोलन करेल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. तसेच राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांशी हातमिळवणी केल्याचा आरोप त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला. यावेळी फडणवीसांनी धरणांचे दरवाजे उघडण्याच्या वेळेची चौकशी करण्याची मागणी केली. नुकत्याच झालेल्या पावसात धरणाचे दरवाजे अचानक उघडल्याने मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.