ऐन निवडणुकीत लाडकी बहीण योजनेवर देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य

अकोला : ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात लाडकी बहीण योजनेवर मोठं विधान केलं आहे. जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना कुणीही बंद करू शकणार नाही, असा पुनरुच्चार फडणवीसांनी केला.
भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीच्या प्रचार सभेसाठी देवेंद्र फडणवीस अकोल्यात आले होते. क्रिकेट क्लब मैदानावर झालेल्या या सभेला पालकमंत्री आकाश फुंडकर, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी, भाजप आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरीश पिंपळे, वसंत खंडेलवाल यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
हेही वाचा – इंद्रायणीनगर – भोसरी प्रभाग ८ मध्ये भाजपाची ताकद वाढली!
यावेळी फडणवीस यांनी राज्यातील लहान महापालिकांसाठी मोठी घोषणा करत सांगितले की, विकास योजनांमध्ये यापुढे लहान महापालिकांचा ३० टक्के हिस्सा राज्य सरकार भरणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे विकास कामे रखडलेल्या महापालिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सभेत बोलताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे नागरीकरण झालेले राज्य असून, या निवडणुकीचा थेट परिणाम शहरी नागरिकांच्या जीवनावर होणार आहे. याआधीच्या सरकारांनी शहरांकडे दुर्लक्ष केल्याने झोपडपट्ट्या, कचरा, नाल्या आणि दुर्गंधी अशा समस्या निर्माण झाल्या. मात्र, २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर शहरांसाठी विशेष योजना सुरू झाल्या आणि लाखो कोटींचा निधी देण्यात आला, असेही त्यांनी सांगितले.




