दिपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी उप वनसंरक्षक विनोद शिवकुमारला अटक!
![Govt slaps officer for harassing Deepali Chavan](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/dipali.jpg)
नागपूर – मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी दिपाली चव्हाण यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. उप वन संरक्षक विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आता समोर आली आहे. दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर त्यांची सुसाईड नोट सापडली. यात उप वन संरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यानंतर अखेर पोलिसांनी विनोद शिवकुमार याला नागपूर रेल्वे स्टेशनवरून अटक केली आहे.
विनोद शिवकुमार बंगळूरूला जात असल्याची माहिती अमरावती पोलिसांना कळाली होती. त्यांनी ही माहिती लोहमार्ग पोलिसांना दिली. त्यानंतर सकाळी 9 वाजता अमरावती पोलीस देखील तिथे पोहचले. अमरावतीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय यांच्यासमवेत लोहमार्ग पोलीस योगेश घुरडे यांच्या टीमने शिवकुमारचा शोध घेतला.
दिल्ली बंगळुरू एक्सप्रेस गाडीत बसण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी शिवकुमारला अटक केली. सकाळी 9:30 वाजता पोलिसांनी ही अटक केली आहे. अटक केल्यानंतर त्याला अमरावतीला नेण्यात आलं. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन शिवकुमार पळून जाण्याच्या तयारीत होता. पण पोलिसांनी त्याला अखेर अटक केली.
दरम्यान, विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली होती. तर वेळोवेळी शिवकुमार यांनी जाच केल्याचा आरोप दिपाली चव्हाण यांनी शिवकुमार यांच्यावर केला होता. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.