ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
![Departure of Sri Santshrestha Dnyaneshwar Maharaj Palkhi to Pandharpur](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Sant-Dnyaneshwar-Maharaj-palkhi-1-780x470.jpg)
पुणे : ‘टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीचा वीणा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा… टाळ-मृदंगाच्या तालावर भजनात दंग वारकऱ्यांची पाऊले…. ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी…अशा भक्तिमय वातावरणात आळंदी येथून आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने आज पंढरपूरकडे प्रस्थान केले.
आळंदी येथील समाधी मंदिरात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पालखीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार श्रीकांत भारतीय, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त ॲड. विकास ढगे, गुरु हैबतबाबा यांचे वंशज बाळासाहेब पवार – आरफळकर आदी उपस्थित होते.
हेही वाचा – आनंदाची बातमी! मान्सून महाराष्ट्रात दाखल, येत्या ४८ तासांत महाराष्ट्र व्यापणार
मानाच्या पालखी प्रदक्षिणेनंतर आळंदी संस्थान येथील गांधीवाडा देवस्थानाकडे पालखी सोहळ्याचे मुक्कामासाठी प्रस्थान झाले. प्रस्थान सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.
वारकऱ्यांसाठी सुविधा आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन, मंदीर संस्थान, पुणे व पिंपरी-चिंचवड मनपाने तयारी केली आहे. आळंदीत पाण्याची सोय, विजेची सोय, वैद्यकीय पथके, पालखी मार्गाचे वेळापत्रक, मंदिराच्या प्रवेशद्वारावर धातूशोधक यंत्रणा, सुलभ शौचालय, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, नदी पात्रात बोटीची व्यवस्था, सूचना फलक अशी व्यवस्था करण्यात आली असून जागोजागी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आलेल्या आहेत. तसेच ध्वनीक्षेपणाद्वारे सूचनाही देण्यात येत आहे.