कोकण किनारपट्टीला पुन्हा चक्रीवादळाचा तडाखा? सतर्क राहण्याचे आवाहन
![Cyclone hits Konkan coast again? An appeal to be vigilant](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Shaheen-cyclone.jpg)
रत्नागिरी | फयान, निसर्ग, तौक्ते, जवाद आदी चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीजवळ राहणाऱ्या लोकांचे अतोनात नुकसान झालेले असताना आता आणखी एक वादळ येऊ धडकणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने २१ मार्चला त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. याचा फटका कोकण किनारपट्टीला बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीजवळ राहणाऱ्या नागरिकांना आणि मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागारात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे २१ मार्च रोजी चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. यामुळे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता मच्छिमारांना सतर्क करण्यात आले असून या काळात समुद्रात न उतरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, मच्छिमारांना इतर राज्यांच्या जवळपासच्या भागात निवारा आणि सुरक्षित ठिकाणांची आवश्यकता भासू शकते. याकरीता वादळी हवामानामुळे जहाजांना सुरक्षित ठिकाण व इतर किनारपट्टीवरील राज्यातील मच्छिमारांना निवारा देण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
गेल्या काही वर्षांपासून सततच्या चक्रीवादळ आणि लहरी हवामानामुळे कोकणाचे अतोनात नुकसान झाले आहे. येथील बागायतदार तब्बल २५ वर्षे मागे गेले आहेत. मच्छिमारही आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यात आता या नव्या चक्रीवादळाचा धोकाही कोकण किनारपट्टीला असल्याने येथील लोक धास्तावले आहेत.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वारे उत्तरेकडे सरकत अंदमान निकोबार बेटांच्या जवळून जाणार आहेत. त्यामुळे या बेटांना जोरदार वारे आणि पावसाचा फटका बसू शकतो. २२ मार्चला हे चक्रीवादळ म्यानमार-बांगलादेशच्या किनारपट्टीजवळ पोचेल अशी माहिती आयएमडीने दिली आहे.