#Covid-19: प्राणवायू पुरवठ्याअभावी बीडमध्ये दोघांचा मृत्यू?
![“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचाही मृत्यू नाही”; उत्तर प्रदेश सरकारचा दावा](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/oxygen_tank.jpg)
बीड |
जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात उपचार घेत असलेल्या दोघांचा प्राणवायू पुरवठा यंत्रणा बंद झाल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. रुग्णांच्या नातेवाइकांनी याबाबत प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. तर रुग्णालय प्रशासनाने मात्र अज्ञात व्यक्तीकडून प्राणवायू पुरवठा बंद झाला होता. मात्र दोन्ही रुग्ण गंभीर स्थितीतील असल्यामुळेच ते या कारणानेच दगावले असे म्हणता येणार नसल्याचे म्हटले आहे. बीड जिल्हा रुग्णालयात शनिवारी पहाटे काठोडा (ता. गेवराई) आणि नायगाव (ता.पाटोदा) येथील दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कक्ष क्रमांक सात आणि आठमध्ये उपचार घेत असलेल्या या दोन रुग्णांचा प्राणवायू पुरवठा अचानक बंद झाला.
नातेवाइकांनी तातडीने तेथील कर्मचाऱ्याच्या ही बाब निदर्शनास आणून देत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यानंतर प्राणवायू पुरवठा सुरळीत करण्यात आला, तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला असा आरोप रुग्णांचे नातेवाईक राहुल कवठेकर आणि संजय राठोड यांनी केला. यासंदर्भात जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनी सांगितले, की अज्ञात व्यक्तीने प्राणवायू पुरवठा बंद केला होता. ही बाब लक्षात येताच आम्ही तातडीने संबंधित कर्मचाऱ्यांमार्फत पुरवठा सुरू केला. प्राणवायू न मिळाल्याने दोघांचा मृत्यू झाला असे म्हणता येणार नाही. कारण त्यांची प्रकृती गंभीर होती. एका रुग्णाचा सिटी स्कॅनमधील संसर्ग गुणांक एकोणीस तर दुसऱ्याचा तेवीस होता. या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचेही डॉ. राठोड म्हणाले.
चौकशीची मागणी
बीड जिल्हा रुग्णालयात प्राणवायू पुरवठा बंद झाल्याने दोन रुग्ण दगावल्याची घटना घडली. या प्रकारामुळे रुग्णालयाचा अनागोंदी कारभार समोर आला असून जिल्हा प्रशासनानेदेखील या घटनेला दुजोरा दिला आहे. सदरील घटना अतिशय दुर्दैवी असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली आहे.
लातूरमध्ये रुग्णाचा प्राणवायूअभावी मृत्यू
लातूर : कोविड काळजी केंद्रातून गंभीर स्थितीत उपचारांसाठी पाठविलेल्या रुग्णाचा प्राणवायूअभावी मृत्यू होण्याची घटना येथे घडली.या रुग्णाला शहरातील १२ नंबर पाटी कोविड सेंटरमध्ये चार दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. त्या केंद्रात प्राणवायू देण्याची व्यवस्था आहे. मात्र, रुग्णाची प्रकृती नियंत्रणाबाहेर जात असल्याने त्याला ‘व्हेंटिलेटर’साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलवले. या वेळी रुग्णवाहिकेतून त्यांना आणल्यावर त्यांचा प्राणवायूअभावी मृत्यू झाला.
वाचा- पुण्यातील आमदराला हनी ट्रॅपमध्ये फसवण्याचा मोठा डाव उधळला…