#CoronoVirus:भंडारा जिल्हा ग्रीन झोनमधून पुन्हा ऑरेंज झोनमध्ये
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/2-14.jpg)
भंडारा : भंडारा जिल्हा कोरोनाच्या ग्रीन झोनमधून पुन्हा ऑरेंज झोनमध्ये आला आहे. कोरोना रेड झोन पुण्यावरुन आलेल्या वयोवृद्ध पती-पत्नी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या दाम्पत्याला पुण्याहून खाजगी गाडीत घेऊन येणाऱ्या चालकाला आणि त्याच्या परिवाराला क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
या कोरोनाबाधित दाम्पत्याशी संबधित 29 जणांनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे. आतापर्यंत एकूण 3 पॉझिटिव्ह रुग्ण जिल्हयात आढळलेले असून एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हयात दोन पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी दिली.
या रुग्णांमध्ये 58 वर्षीय महिला आणि 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. हे पती-पत्नी पुणे येथून 14 मे रोजी भंडाऱ्याला आले होते. त्यानंतर 15 मे रोजी त्यांना क्वारंटाईन करुन तात्काळ त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाला ते कोरोना पाझिटिव्ह आढळले आहेत.
हे कोरोनाबाधित पुण्यातील असल्याने आणि भंडारा येथे येताच लगेच त्यांची वैद्यकीय तपासणी करत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने ते राहत असलेले क्षेत्र कंटोनमेंट झोन जाहीर करण्यात आलेले नाही.
ज्या खाजगी गाडीने ते भंडाराला आले होते, त्या गाडीच्या चालकाला त्याच्या परिवारासह क्वारंटाईन करण्यात आले. तसेच, 29 अति धोक्यातील लोकांनाही क्वारंटाईन करण्यात आले असून या सर्वांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.