रायगडमध्ये शाळेत कोरोनाचा उद्रेक; दोन शिक्षकांसह 15 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह
![Corona outbreak at school in Raigad; 15 students corona positive with two teachers](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/mumbaitak_2022-01_751a3c22-98ff-4a46-9b9f-fa3bc8ee4338_Raigad_school.jpg)
रायगड | प्रतिनिधी
कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वेगानं वाढू लागली आहे. त्यातच आता शाळांमध्येही कोरोना शिरकाव करू लागला असून, अहमदनगरमधील जवाहर नवोदय विद्यालयानंतर रायगड जिल्ह्यातील एक शाळा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली आहे. शाळेतील दोन शिक्षकांसह तब्बल 15 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात विन्हेरे येथील शाळेत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात 15 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा समावेश आहे.
शाळेत शिक्षण घेणारा एक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांची अँटिजन चाचणी करण्यात आली. सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मिळून 238 जणांची अँटीजन चाचणी करण्यात आली. यात 15 विद्यार्थ्यासह 2 शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कोणतीही लक्षणं नसल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
नवोदय विद्यालयातील 226 विद्यार्थी विलगीकरणातून बाहेर
अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे जवाहर नवोदय विद्यालयातील काही विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे मागील 12 दिवसांपासून विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचं विलगीकरण करण्यात आलं होतं. विलगीकरण केलेल्यांपैकी 226 विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
विद्यालयात दररोज कोरोना बाधित मुलं आढळून येत असल्यानं पालकांकडून मुलांना घरी सोडण्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे प्रशासनाने 12 दिवसांनंतर 226 मुलांना घरी सोडलं. 310 मुलांचे विलगीकरण करण्यात आले होते. दरम्यान, पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एकूण 45 मुलांना घरी सोडण्यात आले आहे. उर्वरित 38 मुलांना लवकरच सुट्टी दिली जाणार असल्याच अधिकाऱ्यांनी सांगितलं.