काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन; कोल्हापूरमध्ये शोककळा
![काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन; कोल्हापूरमध्ये शोककळा](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/catmlsj-202112730079_202112289953.jpg)
कोल्हापूर |
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले. त्यांच्यावर हैद्राबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. आजारपणामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सर्वच पक्षातील नेत्यांशी जाधव यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. निवडणुकीच्या आधी काँग्रेसमध्ये प्रवेश करून जाधव हे एका महिन्यात आमदार म्हणून निवडून आले होते. गेल्या आठ दिवसांपासून चंद्रकांत जाधव यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
आमदार चंद्रकांत जाधव यांना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये करोनाची लागण झाली होती. तेव्हा त्यांना त्यांच्या फुफ्फुसाला संसर्ग झाला होता. त्यावर स्थानिक रुग्णालयात एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र आठ दिवसांपूर्वी पुन्हा त्रास जाणवू त्यांना हैदराबाद मध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान रक्तदाब कमी झाल्याने त्यांचे निधन झाले.
उद्योजक म्हणून चंद्रकांत जाधव यांनी मोठे यश मिळवले होते. उद्योजकांचे प्रश्न धसास लावणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख जिल्ह्यामध्ये होती. चंद्रकांत जाधव यांचे फुटबॉल खेळावर निस्सीम प्रेम होते. कोल्हापुरातील तालीम मंडळांचे ही ते हितचिंतक होते. बुधवारी दुपारी त्यांचे पार्थिव कोल्हापुरात आणले जाणार आहे. चंद्रकांत जाधव यांचे जाधव इंडस्ट्रिज, प्रेमला पिक्चर्स, जाधव टूल्स, जाधव बेवरेजेस, जाधव मेटल्स, प्रेमला इंडस्ट्रिज असे उद्योग आहेत. उद्योग क्षेत्रात त्यांनी लौकिक मिळवला होता.