जनसंवाद सभेत नागरिकांच्या तक्रारी, प्रशासनाकडून निराकरणाची अपेक्षा
![Complaints of the citizens in the public dialogue meeting, expectation of resolution from the administration](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/pimpri-chinchwad-municipal-corporation-780x470.jpg)
पिंपरी : महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत ८२ नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे २०, ७, २, ६, १०, ११, ११ आणि १५ नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले.
नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. जनसंवाद सभा ही नागरिक आणि महापालिका यांच्यातील समन्वय ठरत असून विविध प्रश्न, सूचना, तक्रारींच्या माध्यमातून महापालिकेची ध्येय धोरणे, निर्णयांमध्ये नागरी सहभाग वाढवण्यासाठी देखील महत्वाची भूमिका बजावत आहे.
अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह, या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, मनोज सेठिया समाज विकास विभागाचे उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, आरोग्य विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर यांनी भूषवले. तसेच क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, अमित पंडित, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, शीतल वाकडे, विजयकुमार थोरात हे उपस्थित होते. आठही क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत स्थापत्य, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता तसेच उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन या विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. पाणीपुरवठा योग्य दाबाने करावा, रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, पथारीवाल्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई करावी, खराब झालेल्या ड्रेनेज लाईन दुरुस्त कराव्यात, रस्त्यांवरील बेवारस वाहने तसेच अनेक दिवसांपासून रस्त्यावर उभी असलेली वाहने जप्त करण्यात यावीत, शहर परिसरात वेळोवेळी किटकनाशक फवारणी करण्यात यावी, अनधिकृत बांधकामांवर प्रतिबंध व निष्कासनाची कारवाई करावी अशा सूचनावजा तक्रारींचा समावेश आहे.