शरद पवारांनी त्यावेळी जे केलं तेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं, गटनेता बदलण्याच्या निर्णयाचा नेमका अर्थ…
![शरद पवारांनी त्यावेळी जे केलं तेच उद्धव ठाकरेंनी केलं, गटनेता बदलण्याच्या निर्णयाचा नेमका अर्थ](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/शरद-पवारांनी-त्यावेळी-जे-केलं-तेच-उद्धव-ठाकरेंनी-केलं-गटनेता.jpg)
मुंबई : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेत गटनेता बदलण्याचा निर्णय घेतला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेने मोठी कारवाई केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेनं मोठा निर्णय घेतला. शिवसेनेनं एकनाथ शिंदेंना शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेते पदावरुन हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी आमदार अजय चौधरी (Ajay Chaudhari) यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हा मोठा निर्णय घेतला असला तरी त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयाची छाप दिसत आहे.
- एकनाथ शिंदे गटासाठी धक्का
एकनाथ शिंदे आणि शिंदे समर्थक गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. नव्याने नियुक्ती झालेले अजय चौधरी हे मुंबईतील शिवडी मतदारसंघाचे विधानसभा आमदार आहेत. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेता बदलण्याचा तातडीनं निर्णय घेतल्यानं संभाव्य धोका टाळण्यात सेनेला मोठं यश आलं आहे.
- शरद पवारांनी त्यावेळी काय केलेलं?
महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेची धामधूम सुरु होती. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सर्व बोलणी पूर्ण झाली होती. दुसऱ्या दिवशी सरकार स्थापन होणार असं ठरलं होतं नेमक्या त्याच वेळी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत शपथविधी स्थापन केलं. संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्यावेळी धक्का बसला होता. राष्ट्रवादी काँग्रेसनं गटनेता म्हणून अजित पवारांची निवड केली होती. मात्र, त्याची नोंदणी विधिमंडळ कार्यालयात केलेली नव्हती. त्यामुळं शरद पवार यांनी तातडीनं अजित पवार यांना राष्ट्रावादीच्या गटनेते पदावरुन हटवलं. गटनेतेपद जयंत पाटील यांची निवड केली आणि त्याची नोंदणी विधिमंडळ कार्यालयात केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा गटनेता बदलल्यानं एकनाथ शिंदे यांच्या गटाला धक्का बसला आहे. कारण, एकनाथ शिंदे आता त्यांच्या सहीनं विधिमंडळ कार्यालयाला राज्यपाल कार्यालयाला आमदारांच्या पाठिंब्यासंदर्भातील पत्र देऊ शकणार नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीनं पावलं उचलतं गटनेता बदलल्यानं ते एकनाथ शिंदे यांचं बंड शमवण्यात यशस्वी ठरतात का हे पाहावं लागेल.