‘शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच’; भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात त्यांना सीतामाईंबद्दल कळवळा कसा?

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच राम मंदिराच्या बाबत एक वक्तव्य केले होते. ज्यात राम मंदिराबाबत सर्वजण बोलतायत, पण सीतेच्या मुर्तीबाबत का बोलत नाही, अशी नाराजी महिलांनी आपल्याकडे व्यक्त केल्याचे शरद पवारांनी म्हटले. आता यावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.
राम मंदिरात सीतामाईची मूर्ती का नाही? असा जावईशोध शरद पवार यांनी लावला आहे. एरवी हेच पवार मंदिराच्या प्रश्नावर नाक मुरडत आपण नास्तिक असल्याची शेखी मिरवत असतात, अशी तिखट टीका बावनकुळेंनी शरद पवारांवर केली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, शरद पवारांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करण्यापूर्वी राम मंदिराची थोडी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. असे ते म्हणाले.
हेही वाचा – ‘शेतकर्यांना वार्यावर सोडणाऱ्या सरकारला घरी बसविण्यासाठी ‘मशाल’ पेटवा’; संजोग वाघेरे पाटील
राम मंदिरात बालरूपातील रामलल्ला विराजमान आहेत पण पवारांना फक्त राजकारण करण्यात रस आहे. बरं जे शरद पवार निवडणुकीसाठी घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात त्यांना आज सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच म्हणावा लागेल, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.





