‘शिरूरमध्ये महायुतीच्या सर्व नेत्यांनी आढळरावांना ताकद द्यावी’; चंद्रकांत पाटलांचं महायुतीच्या नेत्यांना आवाहन
![Chandrakant Patil said that all the leaders of the Mahayuti should give strength to the Adha Rao in Shirur](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Chandrakant-Patil-780x470.jpg)
पुणे | आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीसाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सुचना यावेळी केल्या. तसेच लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, देशभरातल्या ५७२ लोकसभेच्या जागांना एक कल्स्टर प्रमुख अशी विभागणी केली आहे. महाराष्ट्रातल्या ४८ जागांसाठी १६ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. काल या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १६ प्रभारी जणांची एक संयुक्त बैठक पार पडली. त्या क्लस्टर प्रमुखांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या तीन लोकसभातील महायुतीतील २० पक्षांच्या नेत्यांची मोट बांधायची, संवाद निर्माण करायचा असं ठरवण्यात आलं. पंधरा दिवसापुर्वी बारामती लोकसभेची बैठक पार पडली. त्यानंतर पुणे लोकसभेकरीता विधानसभानिहाय बैठक केली. त्यानंतर आता शिरूर लोकसभेसाठी बैठक पार पडली. यामध्ये सर्व महायुतीच्या नेत्यांची ताकद लावावी, सगळे रूसवे फुगवे दुर व्हावे यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा – ‘उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमच्यासाठी फक्त कमळ हाच उमेदवार’; जगदीश मुळीक
यातच शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात नाराजी आहे. तसेच अनेक जण अजूनही इच्छूक आहेत. यावर बोलतांना ते म्हणाले की, महायुतीमध्ये तीन प्रामुख्याने पक्ष आहेत. त्या पक्षातील नेत्यांना उमेदवारी मिळाली आहे. राहिला प्रश्न मित्र पक्षांचा. तर महादेव जानकर यांना उमेदवारी मिळाली आहे. आता जे काही नेते आहेत. त्यांनी त्या त्या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करावा. असेही ते म्हणाले.
शिरूर लोकसभा मतदारसंघात काही कार्यकर्त्यांना न आवडणारा निर्णय झाला आहे. ही काही नेत्यांच्या मनात दुहेरी भावना निर्माण झाली आहे. ही भावना त्यांच्या मनातून काढण्यास कार्यकर्ते सक्षम आहेत का ? त्यावर चंद्रकांत पाटलांनी अस्सल गावरान पद्धतीने उत्तर दिले आहे. ग्रामीण भागात एका मुलाने कुटुंबातील सगळ्यांना न आवडणाऱ्या मुलींसोबत लग्न केले. परंतु नंतर सगळे तीला स्विकारतात. मग ती सून सगळ्यांची लाडकी सून होते. असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी चौकार लावला.