“भाजपा ही सेफ बोट, ती कधीच…”; महाविकास आघाडीला टायटॅनिक म्हणत नारायण राणेंचा खोचक टोला
![ED notice prepared for four on Matoshri, Narayan Rane's explosive tweet](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Narayan-Rane2.png)
मुंबई |
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला शेलक्या शब्दात सुनावलं आहे. महाविकास आघाडी टायटॅनिक बोट आहे, तर भाजपा सेफ बोट आहे, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली आहे. तसंच त्यांच्या बोटीत कोणी चढणार नाही आणि आमच्या बोटीला काही होणार नाही, असंही राणे म्हणाले आहेत.
पुण्यातल्या सिम्बायोसिस संस्थेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाला नारायण राणे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट दिली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी राणे म्हणाले, “आमच्यातून जाण्याचा कोणी प्रयत्न करणार नाही. टायटॅनिकच्या बोटीत कोणी बसणार नाही.आमची सेफ बोट आहे. इथून सुटते आणि थेट दिल्लीला पोहोचते. शिवसेनेचं काही खरं नाही. टायटॅनिक बोट शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिघांची आहे. प्रत्येकजण आपल्या बाजूनं खेचत असतो”.
मिलिंद नार्वेकर यांनी आज बाबरी मशीद बलिदान दिवस असल्याचं ट्वीट केलं होतं. याबद्दल पुण्यातल्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी नारायण राणेही जवळच उभे होते. या ट्विटबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, नार्वेकरांचं बरोबरच आहे. त्यात चुकीचं काय? एवढ्यात नारायण राणे म्हणाले, “नार्वेकर म्हणजे नवे शिवसेनाप्रमुख का?” असं म्हणताच त्यावर पुढे काहीही न बोलता राणे निघून गेले.