विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावीनंतर आता बारावीच्या परीक्षाही रद्द, राज्य सरकारचा निर्णय
![Attend Sadenoula's paper of eleven, there will be thermal screening; Rules for students](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/board-exams-1584594992.jpg)
मुंबई – देशात कोरोना ससंर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. त्या धर्तीवर आता राज्य सरकारनेही महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या संदर्भात चर्चा झाली होती. बारावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूर झाला असल्याची माहिती मिळाली आहे. काल मंत्रिमंडळ बैठकीत 12 ची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला जाईल. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं.
एप्रिल महिन्यात नियोजित असणारी बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मे महिन्याच्या शेवटी कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षा कधी घ्यायच्या यावर विचार केला जाईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. त्यावरून राज्यातील बोर्डाच्या परीक्षा संदर्भात बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे पाठवण्यात आला. हा प्रस्ताव आपत्ती व व्यवस्थापन विभागाने मान्य केल्याने परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
दहावीच्या परीक्षाही रद्द
मार्च ते एप्रिल महिन्यात नियोजित असणारी दहावीची परिक्षा कोरोच्या वाढत्या संसर्गामुळे रद्द करण्यात आली. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात पुण्याचे प्राध्यापक कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यानंतर याचिकाकर्त्यानेही आपली याचिका मागे घेतली. त्यामुळे राज्यात दहावीचीही परीक्षा होणार नाही हे जवळपास निश्चित झालं आहे.
सीबीएसई बोर्डाची परीक्षा रद्द
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्य व इतर तज्ज्ञांशी विस्तृत चर्चा केली, त्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मुलांची सुरक्षा आणि आरोग्य ही प्राथमिकता आहे. अशा वातावरणात मुलांना ताण देणे योग्य नाही. मुलांचे जीवन धोक्यात घालू शकत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं. सीबीएसई परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात आला आहे. आमच्यासाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि या पैलूवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये चिंता आहे, ती संपवली पाहिजे. अशा तणावग्रस्त परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेस भाग घेण्यास भाग पाडले जाऊ नये म्हणून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं.