आई तुळजाभवानीच्या अभिषेक पूजेच्या शुल्कात मोठी वाढ!
![Big increase in Abhishek pooja fee of Mother Tuljabhavani!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Tuljabhavani-mandir-780x470.jpg)
तुळजापूर : आई तुळजाभवानीच्या अभिषेकासाठी आता ५० रुपयां ऐवजी ५०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तुळजाभवानी मंदिर समितीने हा निर्णय घेतला असून याची सोमवारपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे तुळजाभवानी मातेच्या व्हीआयपी दर्शनसाठीही आता २०० रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे.
मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळजाभवानी मंदिर समितीच्या विश्वस्त कोट्यातून भाविकांना व्हीआयपी दर्शनाची मोफत मुभा यापूर्वी उपलब्ध करून दिली जात होती. त्यात आता बदल करण्यात आला आहे. या दोन्ही निर्णयांची अंमलबजावणी सोमवार १० जुलैपासून केली जाईल.
हेही वाचा – आमदार बच्चू कडू यांचा शिंदे सरकारला सूचक इशारा; म्हणाले..
तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांचे उपमुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण झाले. पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबर भाविकांना सुलभ दर्शन मिळेल असे नियोजन करा अशा सूचना उपमुख्यमंत्री केल्या. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदीर आणि शहर परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबर भाविकांचे तुळजाभवानीचे दर्शन सुलभ आणि जलदगतीने व्हावे यासाठी प्रस्तावित तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात सुयोग्य नियोजन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.
मंदिराच्या सध्याच्या वास्तुचे जतन आणि संवर्धन, सेवा सुविधांमध्ये दर्जात्मक वाढ, मंदिर परिसर आणि शहरातील पायाभूत सुविधांचा विकास, भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन सध्याच्या सोयी सुविधांचा विकास आणि विस्तार, गर्दीचे व्यवस्थापन या मुद्दांचा प्रामुख्याने प्रस्तावित आराखड्यात विचार करण्यात आला आहे.