“शेतकऱ्याच्या विरोधात जाणार त्याचा पराभव होणार”, अमरावती जिल्हा बँक विजयानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया
![Bachchu Kadu's first reaction after victory of Amravati District Bank](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/bacchu-kadu.jpg)
अमरावती |
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा आज (५ ऑक्टोबर) निकाल लागला. यात परिवर्तन व सहकार पॅनल आमनेसामने होते. या निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू हे सुद्धा परिवर्तन पॅनलकडून निवडणूक रिंगणात होते. आज मतमोजणी पार पडली यात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बँकेचे माजी अध्यक्ष व काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलु उर्फ अनिरुद्ध देशमुख यांचा पराभव केला.
बच्चू कडू यांनी दोन मतांनी विजय मिळवला. बच्चू कडू विजयी होताच त्यांच्या समर्थकांनी चांगलाच जल्लोष केला. या विजयावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, “शेतकऱ्यांनी चीड व्यक्त केलीय आणि त्याचाच हा विजय आहे. आम्ही हे दाखवून दिलं की जो शेतकऱ्याच्या विरोधात जाणार त्याचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचे मी आभार मानतो.”
- “सावकारकी सोडावी लागेल, सुटाबुटात राहून निवडणूक लढता येणार नाही”
“ज्यांच्याविरोधात आम्ही निवडून आलो त्यांना इतकंच सांगेल की सुटाबुटात राहून निवडणूक लढता येणार नाही. सामान्य माणसापर्यंत जावं लागेल. सावकारकी सोडावी लागेल. त्याशिवाय विजय होणार नाही. आता ही बँक आम्ही शेतकऱ्याच्या दारापर्यंत नेण्याचा प्रयत्न करु,” असंही बच्चू कडू यांनी नमूद केलं.