“बाबांनो, ‘हे’ करायला अक्कल लागते”, नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा हल्लाबोल
![“बाबांनो, ‘हे’ करायला अक्कल लागते”, नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा हल्लाबोल](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/ajit-pawar-rane.jpg)
मुंबई |
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात जाऊन जोरदार टोलेबाजी केलीय. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन करताना अजित पवार यांनी मतदारांना विचारपूर्वक मतदान करण्याचं आवाहन केलं. संस्था उभ्या करायला अक्कल लागते, मात्र, संस्था अडचणीत आणायला अक्कल लागत नाही असं म्हणत त्यांनी राणेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ते रत्नागिरीत प्रचारसभेत बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “सिंधुदुर्गच्या जिल्हा बँकेच्या प्रतिनिधींना, मतदारांना मला सांगायचं आहे की बाबांनो फार विचार करून मतदान करा. संस्था उभ्या करायला डोकं लागतं, अक्कल लागते. मात्र, संस्था अडचणीत आणायला डोकं, अक्कल लागत नाही. सर्वांनी निर्धाराने मतदान करा. कुणाच्याही दबावाला, दादागिरीला, दहशतीला बळी पडण्याचं अजिबात कारण नाही. इथं कशाप्रकारे काही घटना घडल्या याचा इतिहास तुम्हा सर्वांच्या समोर आहे. म्हणून मतदारांनी गाफील राहू नका अशी विनंती आहे.” “काही महाभागांनी कर्ज कसं मिळवलं, कसं थकवलं हे पाहा. कुणाच्याही दबावाला, दहशतीला बळी पडू नका. विचारपूर्वक मतदान करा,” असं आवाहन अजित पवार यांनी जिल्हा बँकेच्या मतदारांना केलं आहे.