अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्लाचा कट, हँड ग्रेनेडसह एकास अटक
पाकिस्तान ISI च्या संपर्कात, 19 वर्षीय युवकाला अटक

दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे. दहशतवादी हल्ला करणारा युवक पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होता. त्याने आयएसआयकडून प्रशिक्षण घेतले होते. हल्ला करण्यासाठी त्याने राम मंदिराची रेकी केली होती. त्याने योजना अंमलात आणण्यापूर्वी गुजरात अँटी टेररिस्ट स्कॉड आणि फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्सने संयुक्त ऑपरेशन करुन त्याला अटक केली. तो उत्तर प्रदेशातील फेजाबाद (अयोध्या) येथे राहतो. अब्दुल रहमान (19) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून दोन हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयीत आरोपी अब्दुल रहमान पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होता. तो राम मंदिरावर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होता. फैजाबादमध्ये मटन शॉप चालवणारा अब्दुल रहमान हा कट्टवादी लोकांच्या संपर्कात आला होता. आयएसआयने राम मंदिराच्या निर्मितीनंतर त्या ठिकाणी दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट रचला होता. त्यासाठी अब्दुल रहमान याला प्रशिक्षण दिले होते.
हेही वाचा : ‘विरोधी पक्षनेते पदावर आमचा हक्क’; संजय राऊत यांचं विधान
राम मंदिराची केली होती रेकी
अब्दुल रहमान याने हल्ला करण्यासाठी राम मंदिराची रेकी केली होती. त्याने सुरक्षा संदर्भातील महत्वाची माहिती आयएसआयला पुरवली होती. राम मंदिराचे हँड ग्रेनडच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्याची त्यांची योजना होती. त्यासंदर्भात गुजरात एटीएसला इनपुट मिळाले. त्यानुसार फरीदाबाद पोलिसांच्या संयुक्त विद्यामान आरोपीला अटक केली.
फैजाबादमधून ट्रेनने अब्दुल रहमान आधी फरीदाबादमध्ये दाखल झाला होता. त्या ठिकाणी एका हँडलरने त्याला हँड ग्रेनेड दिले. योजनेनुसार, पुन्हा ट्रेनने अयोध्या पोहचून हल्ला करायचा होता. परंतु त्यापूर्वीच सुरक्षा संस्थांना त्याची माहिती मिळाली. त्यानंतर रविवारी अब्दुल रहमान याला अटक केली. त्याची हरियाणा पोलीस आणि केंद्रीय तपास संस्था कसून चौकशी करत आहे. त्याच्या मोबाईल आणि इतर साहित्याच्या माध्यमातून तपास केला जात आहे.