भीषण! अचानक लागलेल्या आगीत तब्बल दीड लाख कडब्याच्या पेंडी जळून खाक
![भीषण! अचानक लागलेल्या आगीत तब्बल दीड लाख कडब्याच्या पेंडी जळून खाक](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/भीषण-अचानक-लागलेल्या-आगीत-तब्बल-दीड-लाख-कडब्याच्या-पेंडी-जळून.jpg)
परभणी |
पाथरी तालुक्यातील गुंज येथील विष्णू मंदिर गोशाळेमधील कडब्याच्या गंजीला लागलेल्या आगीमध्ये तब्बल १ लाख ५० हजार कडबा पेंडी व उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. विष्णू मंदिर गोशाळा यांनी त्यांच्या कडब्याची वळई करुन ठेवली होती. अचानक या कडब्याने पेट घेतला. वारा असल्याने आग वाढत गेली. आग लागल्याची माहिती समजताच गावकऱ्यांसह इतर नागरिक आग विझविण्यासाठी धावले. मात्र, परिसरात लागलेली आग विझविणे शक्य झाले नाही. पाहता पाहता या आगीत सुमारे १ लाख ५० हजार कडबा पेंडी जळून खाक झाल्या.
ही आग नेमकी कशी लागली, हे मात्र समजू शकले नाही. दरम्यान, आगीची माहिती मिळाल्यानंतर नगर परिषद पाथरी यांची अग्निशामक गाडीने घटनास्थळी येऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. या आगीत विष्णू मंदिर गोशाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
आगीच्या घटनांमध्ये वाढ…
परभणी जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे. मागील काही दिवसांपासून परभणीत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दिवसाचे तापमान वाढत चालल्याने आगीसारख्या घटना होत आहेत. ज्वारीची काढणी झाली असून अनेक ठिकाणी कडब्याच्या वळई करुन ठेवल्या आहेत. तापमानामध्ये किंवा शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागण्याचे प्रकार होत असून विष्णू मंदिर गोशाळा मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.