चिंता वाढली! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा शिरकाव, 10 रूग्ण बाधित
![#Mucormycosis: 7,998 patients in the state, 729 patients have died till date!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Mucomicosis-e1620721883673.jpg)
अमरावती – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रभर हाहाकार माजला असतानाच आता नव्या एका आजाराने डोकं वर काढलं आहे. म्युकरमायकोसिस या आजाराचे काही रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये एकाच दिवसात तब्बल 2 जणांचा या दुर्मिळ आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर आता अमरावती जिल्ह्यात या आजाराने शिरकाव केला आहे.
कल्याण डोंबिवलीमध्ये या आजाराने सुरूवातीला प्रवेश केला. डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयामध्ये 6 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान,अमरावती जिल्ह्यात या गंभीर आजाराचे 10 रुग्ण आढळले असून त्यांच्यावर रूग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत या आजारावर इलाज मोफत करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर मधुमेह असलेल्या रुग्णांना हा बुरशीजन्य आजार होत असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांनी बोलून दाखवलं आहे.
डोंबिवलीमध्ये काल 69 वर्षीय बाजीराव काटकर तसेच 38 वर्षीय तुकाराम भोईर यांचा म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराने मृत्यू झाल्याची माहिती केडीएमसी आरोग्य विभागाच्या मुख्य आरोग्य अधिकारी अश्विनी पाटील यांनी दिली आहे.
कोरोनाचं संकट डोक्यावर असतानाच आता नव्या एका आजाराने तोंड वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अमरावती जिल्ह्यातही या आजाराने शिरकाव केला असून . दरम्यान,आता कोरोनानंतर म्युकरमायकोसिस या आजाराने राज्यभरात हाहाकार माजणार की काय? असा प्रश्न सर्वांना सतावत आहे.