“संघर्षाचं दुसरं नाव होतं एन. डी. पाटील”; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्पण केली श्रध्दांजली
![“संघर्षाचं दुसरं नाव होतं एन. डी. पाटील”; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्पण केली श्रध्दांजली](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/Ajit-Pawar-New.jpg)
पुणे |
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यपक एन.डी. पाटील यांचं निधन झालं आहे. कोल्हापुरात एका खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान वयाच्या ९३ व्या वर्षी काल अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर आज सकाळी राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालाच्या प्रांगणात सकाळी अंत्यदर्शनासाठी आणले गेले. यावेळी अनेक मान्यवरांसह नेते, कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांच्या अंत्यदर्शन घेतले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अंत्यदर्शन घेत शोकभावना व्यक्त केली. या प्रसंगी त्यांच्या पत्नी सरोज पाटील उर्फ माई, चिरंजीव सुहास पाटील आणि प्रशांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसेच अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार रोहीत पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर आदींची उपस्थिती होती.
“संघर्षाचं दुसरं नाव होतं एन.डी. पाटील. सतत लढा देणं, अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठणं आणि जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत संघर्ष सुरू ठेवणं. मी फार लोक समजात पाहिलेली आहेत, की ज्यांनी एखाद्या पक्षात प्रवेश केल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत त्या पक्षाशी त्यांनी बांधिलकी ठेवली. त्यांनी शेवटपर्यंत शेतकरी-कामगार पक्षाशी बांधिलकी ठेवली. नंतरच्या काळात शेकापचं पूर्वीचं असलेलं वर्चस्व कमीकमी होत गेलं. नंतर रायगड जिल्ह्यापुरतं काही प्रमाणात कोल्हापुर जिल्ह्यापुरतं सांगोला तालुक्यापुरतं ते मर्यादित राहीलं. परंतु, एन.डी.पाटील यांनी कधीही शेतकरी कामगार पक्षाची बांधिलकी कधीही तुटू दिली नाही.” असं अजित पवार यांनी यावेळी बोलून दाखवलं.
तसेच, “कोणताही लढा असेल, कोल्हापुरात अलिकडच्या काळात झालेला जो टोलचा लढा आहे त्याच्याही संदर्भात ते फार आग्रही असायचे. मी एक त्यांचं बघितलं की कुणाचही सरकार असलं, म्हणजे त्यामध्ये जरी काही मंत्री असतील आणि तिथे सुद्धा जर कष्टकऱ्यांच्या, शेतकरी,कामगार, वंचितांच्याविरोधात कुठं काहीतरी चुकल्याचं त्यांच्या लक्षात आलं की ते त्याविरोधात संघर्ष सुरू करायचे. सीमावादाबाबत ज्यांचा बारकाईने अभ्यास होता. या वयातही ते अनेक विषयावरील प्रश्न सोडवून घ्यायचे. खरंतर ते एक चालतं बोलंत विद्यापीठच होतं, प्रत्येक विषयाचा त्यांचा बारकाईने अभ्यास होता. मी समस्त जनतेच्यावतीने माझ्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” असंही अजित पवार म्हणाले.
- सीमा भागातील मराठीभाषिक बांधवांचा आधारवड कोसळला –
याचबरोबर “महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील म्हणजे सामान्य माणसाच्या संघर्षाचा कृतीशील विचार होता. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत ते संघर्ष करीत राहिले. त्यांच्या निधनानं शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्वं हरपलं आहे. सीमाभागातील मराठीभाषिक बांधवांचा आधारवड कोसळला आहे. प्रा. एन. डी. पाटील निर्भिड, नि:स्पृह, निडर नेते होते. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून त्यांनी काम केलं. वयाच्या नव्वदाव्या वर्षीही रस्त्यावर उतरुन संघर्ष करणाऱ्या प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची मोठी हानी आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारमध्ये त्यांनी सहकारमंत्री म्हणून काम केलं. आमदार म्हणून काम केलं. विधानमंडळातील प्रत्येक क्षण आणि प्रत्येक शब्द हा वंचित बांधवांना हक्क मिळवून देण्यासाठी उपयोगात आणला. प्रा. एन. डी. पाटील हे आमच्या कुटुंबातील सदस्य होते. त्यांचं निधन हे महाराष्ट्रातल्या, सीमाभागातल्या प्रत्येक कुटुंबाची हानी आहे. मी प्रा. एन. डी. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल शोकभावना व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पण केली.