“यांच्या मनामध्ये दुसरीच..”; गिरीश महाजनांना बुधवार पेठेत पाठवण्याच्या वक्तव्यावर एकनाथ खडसेंचा खुलासा
!["Another in his mind ..."; Eknath Khadse's statement on the statement to send Girish Mahajan to Peth on Wednesday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/eknath-khadse.jpeg)
पुणे |
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पक्षांतर केल्यानंतरी खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद संपण्याची चिन्हे नाहीत. आता पुन्हा एकदा या वाक् युद्धाची ठिणगी पडली आहे. मनी वसे तशी सृष्टी दिसे असा टोला एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांना लगावला आहे. बुधवार पेठेत दगडुशेठ गणपतीचे मंदिर आहे असे स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी दिले आहे. गिरीश महाजनांनी गणपतीचे दर्शन घ्यावे देव त्यांना सद्बुद्धी देवो असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. रविवारी खडसेंच्या बुधवार पेठेतल्या वक्तव्यानंतर चर्चा सुरु झाल्याने एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
“गिरीश महाजनांना दुसऱ्यांदा करोना झाला आणि त्यांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून मी परवा त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावर गिरीश महाजनांना एकनाथ खडसेंना ठाण्याला पाठवावे असे म्हटले. मी त्यावर गिरीश महाजनांना बुधवार पेठेत पाठवावे असे म्हटले. बुधवार पेठेमध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिर आहे. गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना सद्बुद्धी येईल अशी माझी अपेक्षा होती. पण विकृत मनोवृत्तीचे लोक असल्यामुळे गणपतीच्या ऐवजी दुसरीच कल्पना यांच्या मनामध्ये आली. त्यामुळे मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणीप्रमाणे जसी दृष्टी तशी सृष्टी असे त्यांना वाटले. माझा दृष्टीकोन साफ आहे. त्यांनी गणपतीचे दर्शन घ्यायला हवं हा माझा त्यामागे हेतू आहे. त्यामुळे दगडूशेठ हलवाई गणपती गिरीश महाजनांना नवसाला पावेल अशी मी प्रार्थना करतो,” असे एकनाथ खडसे म्हणाले.
याआधी मराठा विद्या प्रसारक संस्था वादाच्या प्रकरणावरुन पोलिसांकडून तपास सुरु असून गिरीश महाजनांवर मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरु असल्याच्या भीतीपोटी करोना झाला का? असा सवाल उपस्थित केला होता. त्यांच्या या टीकेवर गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना ठाण्यात उपचारांची गरज आहे, असं प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी ‘गिरीश महाजन यांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावं लागेल,’ असा टोला लगावला होता. “नाथाभाऊंना ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. पण गिरीश महाजनांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवलं पाहिजे. जळगावला जे मोक्कामध्ये आरोपी आहेत त्यांच्या घरावर आता पोलिसांची छापेमारीची कारवाई सुरु आहे. संबंधित प्रकरणाविषयी अधिर माहिती घेण्यासाठी हे छापे पडले असावेत”, असं एकनाथ खडसे म्हणाले होते.