टोइंग व्हॅन कामगारांच्या मुजोरीला लगाम, तिघांना टाकले काढून
![Altercation between shopkeeper and traffic department towing van worker over bike parking in Hadapsar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/pune-towing-van-780x470.jpg)
पुणे : टोइंग व्हॅन कामगारांच्या मुजोरीची गंभीर दखल घेऊन संबंधित टोइंग व्हॅनच्या ठेकेदाराला कडक समज देण्यात आली होती. टोइंग व्हॅनवरील तीन कामगारांना कामावरून काढून टाकण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. कारवाई करताना टोइंग व्हॅनवरील कामगारांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. याबाबत टोइंग व्हॅनच्या ठेकेदारांना पुन्हा नियमावलींची आठवण करुन देण्यात आली असून त्यांना प्रत पाठविण्यात आली आहे.
टोइंग व्हॅनवरील एखाद्या कामगाराने अरेरावी किंवा मुजोरी केल्यास नागरिकांनी थेट मारहाण करु नये. याबाबतची तक्रार वाहतूक शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्यास संबंधित ठेकेदाराच्या कामगारांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
टोइंग गाडीतील कामगार वाहनचालकांशी मुजोरी करतात. अरेरावीची भाषा वापरतात तसेच मोटारी ओढून नेणाऱ्या टोइंग गाडीतील लोखंडी जाळीमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडथळा होतो. या जाळीचा दुचाकीस्वारांना धक्का बसल्याने किरकोळ अपघात देखील झाले आहेत.
काही दिवसांपुर्वी हडपसर भागातील एका दुकानासमोर दुचाकी गाडी उचलण्याची कारवाई करताना दुकानदार आणि टोइंग व्हॅनच्या कामगारामध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर वाहतूक शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टोइंग व्हॅनच्या ठेकेदारांना कडक समज दिली आहे. गाडी उचलणाऱ्या टोइंग व्हॅनवरील कामगारांनी वाहतूक शाखेने दिलेल्या नियमांचे पालन करून कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.