“मी तर विचार करतोय राजकारणच सोडून द्यावं”; असं का म्हणाले अजित पवार
हे ऐकल्यापासून आमच्या सगळ्यांची झोप हरपली आहे
नागपुर : विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी करेक्ट कार्यक्रमासंदर्भात नागपुरात केलेल्या विधानावर बावनकुळेंनी खोचक शब्दांत टोला लगावला. त्यानंतर आता अजित पवारांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना बावनकुळेंना खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
बावनकुळेंच्या या वक्तव्याबाबत अजित पवार यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता ते म्हणाले की. अरे बापरे, मला तेव्हापासून झोपच येईना हो..हे ऐकल्यापासून आमच्या सगळ्यांची झोप हरपली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंसारखा एवढा मोठा ताकदीचा नेता अशा पद्धतीने आव्हान देतोय, मी तर विचार करतोय राजकारणच सोडून द्यावं. राजकीय संन्यास घ्यावा. २०२४ मध्ये असा अपमान होण्यापेक्षा संन्यास घेतलेला बरा. सांगा त्यांना, असं अजित पवार म्हणाले.
सोबतच, खरंतर कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे जनता ठरवते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत युती राहूनही कधी राष्ट्रवादी ७५ च्या वर गेली नाही आणि ते काय करेक्ट कार्यक्रम करणार? बारामतीमध्ये हुकुमशाही, मोगलशाहीसारखा कारभार सुरू आहे. माझी एंट्री झाल्यापासून अजित पवारांना भीती वाटत आहे. म्हणून काल सभागृहात त्यांनी म्हटलं आहे की करेक्ट कार्यक्रम करू. आमचा करेक्ट कार्यक्रम करण्याची त्यांच्यात हिंमत नाही. त्यांचा केव्हा करेक्ट कार्यक्रम होईल, हे २०२४ मध्ये जनता ठरवेल, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
अजित पवारांच्या तोंडी हे शब्द शोभत नाहीत. अजित पवार आम्हाला माहिती आहे की वेळप्रसंगी आठ आठ दिवस मोबाईल बंद करून पळून जातात. अंडरग्राऊंड होतात. कधी रडतात. असे अजित पवार बघितले आहेत आम्ही. त्यामुळे अजित पवारांनी विदर्भात आम्हाला आव्हान देऊ नये. त्यांचं कोणतंही, कोणत्याही पातळीवरचं आव्हान स्वीकारायला आम्ही तयार आहोत. त्यामुळे इथून पुढे नागपुरात अजित पवारांनी अशी भाषा करू नये, असंही बावनकुळे म्हणाले.