मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवारांच्या भेटीनंतर छत्रपती संभाजीराजे म्हणाले…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Sambhaji-raje-1.jpg)
मुंबई – मराठा आरक्षण प्रश्नावर जनमताचा कौल घेण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. संभाजीराजे आज सकाळी साडेनऊ वाजता सिल्वर ओकवर पोहोचले. त्यानंतर नऊ वाजून 43 मिनिटांनी ते शरद पवारांची भेट घेऊन बाहेर आले. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 13 मिनिटे चर्चा झाली. मराठा आरक्षण प्रश्नी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे शरद पवारांना सांगितल्याचे संभाजीराजे यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितले. तसेच उद्या मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा करून संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार असल्याची माहितीही संभाजीराजेंनी दिली.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले, ‘तीन-चार दिवस पूर्ण महाराष्ट्राचा मी दौरा केला. पवार साहेबांना मी सांगितले की, मराठा समाज किती अस्वस्थ आहे, किती दुःखी आहे आणि मी एकंदरीत महाराष्ट्रात चालणारी मराठा समाजाची परिस्थिती त्यांच्या कानावर घातली. त्यांना यातून बाहेर काढणे गरजेचे असल्याचे त्यांना सांगितले आणि तुम्ही यात पुढाकार घेणेसुद्धा गरजेचे आहे, असे मी त्यांना सांगितले. मी म्हणालो, तुम्ही असाल, मुख्यमंत्री असतील, विरोधी पक्षनेते असतील, नारायण राणे असतील या सगळ्या लोकांनी तुम्ही एकत्र यायला पाहिजे आणि मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्यायला पाहिजे. त्यांनी सगळं ऐकून घेतलं असून सकारात्मक दृष्टिकोन दाखविलेला आहे आणि उद्या मुख्यमंत्र्यांशीसुद्धा माझी चर्चा होणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्रजींशीसुद्धा चर्चा होणार आहे. तर उद्या संध्याकाळी माझी मुंबईत पत्रकार परिषद होईल’, असे संभाजीराजेंनी सांगितले.
दरम्यान, भाजपाचे मराठा नेते आजपासून विविध जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. प्रवीण दरेकर, नारायण राणे, आशिष शेलार, हर्षवर्धन पाटील आणि नरेंद्र पाटील, इत्यादी नेते आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतील. मराठा नेता आणि कार्यकर्त्यांशी भाजपाचे नेते संवाद साधणार आहेत.