भारतीय संघाच्या जर्सीत केला ‘हा’ मोठा बदल; जाणून घ्या कारण
![A major change has been made in the jersey of the Indian team](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/indian-cricket-team-780x470.jpg)
हार्दिक पांड्याकडे श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यासाठी कर्णधार पदाची जबाबदारी
मुंबई : भारतीय संघ आज श्रीलंकेविरूद्ध आपला नववर्षातील पहिला टी-20 सामना खेळणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे असणार आहे. दरम्यान, संघातील काही खेळाडूंनी श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठीच्या नव्या जर्सीसह सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. मात्र या नवीन वर्षीच्या जर्सीत एक महत्वाचा बदल पाहायला मिळत आहे.
भारतीय संघाच्या जर्सीवर प्रायोजक एमपीएलने अचानकपणे बीसीसीआयसोबतचा आपला करार संपवत राईट्स केवाल किरण क्लोथिंग लिमिटेंड म्हणजेच Brand Killer कडे हस्तांतरित केले. बीसीसीआयच्या अॅपेक्स काऊन्सिल मिटिंगमध्ये मार्चपर्यंत कोणत्याही प्रायोजकाला आपले राईट्स हस्तांतरित करता येणार नाही असा निर्णय झाला होता. मात्र आता भारतीय संघाच्या जर्सीवर अचानकपणे किलरचा लोगो झळकल्यामुळे एमपीएलने आपला करार त्वरित संपवल्याचे स्पष्ट झाले आहे.
बीसीसीआय आणि एमपीएल यांच्यातील जर्सी स्पॉन्सरशिपचा करार हा 31 डिसेंबर 2023 पर्यंतचा होता. यापूर्वी एमपीएलने नोव्हेंबर 2020 मध्ये नायकीकडून हे हक्क मिळवले होते. मात्र बाजारातील मंदी पाहता एमपीएलने बीसीसीआयच्या संमती मिळताच करारातून माघार घेतली आहे.
गेल्या सहा महिन्यात बीसीसीआयने प्रायोजक असलेल्या तीन बड्या कंपन्या गमावल्या. पेटीयमकडे बीसीसीआयचे स्थानिक क्रिकेट हक्क होते. त्यांनी ते मास्टरकार्डकडे हस्तांतरित करण्यात आले. त्यानंतर बायजूसने देखील बीसीसीआयला करार संपण्यापूर्वीच त्यातून बाहेर पडणार असल्याचे कळवले. आता एमपीएलने ऐनवेळी माघार घेत बीसीसीआयला मोठा धक्का दिला आहे.
श्रीलंकाविरूद्ध टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ :
हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.