संभाजी भिडे गुरुजींचा खूप आदर पण… : अमृता फडणवीस
![A lot of respect for Sambhaji Bhide Guruji but... : Amrita Fadnavis](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/1-780x470.jpg)
मुंबई : शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींचा खूप आदर आहे. ते हिंदुत्वाचा स्तंभ आहे. पण महिलांनी कसे जगावे हे कुणी सांगू नये. तिची एक जीवनशैली आहे, अशी प्रतिक्रिया अमृता देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
संभाजी भिडे यांनी मंत्रालयात जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्या भेटीनंतर भिडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यात ते बोलत होते. त्यावेळी संभाजी भिडेंना मंत्रालयात महिला पत्रकाराने प्रश्न विचारला. त्यावर, तू टिकली लाव. आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री ही भारतमातेचं रुप आहे, अन् आमची भारतमाता विधवा नाही. तू आधी कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो, असे म्हणत संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला सल्ला दिला होता. भिडेंनी केलेल्या या विदानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, पंढरपूरमध्ये अमृता फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता त्यांना संभाजी भिडेंनी केलेल्या विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अमृता फडणवीस म्हणाल्या की, संभाजी भिडे गुरुजींचा मी खूप आदर करते. ते एक हिंदुत्वाचे स्तंभ आहेत. पण मला वैयक्तिकरीत्या असं वाटतं की, कुठल्याही महिलेने कसं जगावं, याबाबत कुणी सल्ला देऊ शकत नाही. तिची एक जीवनशैली असते. त्याप्रकारे ती जगते. त्याचा आदर करावा, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.