‘शरद पवार व काँग्रेस नको म्हणून ५० आमदारांनी मूळ घर सोडलं’- निलेश राणे
रत्नागिरी : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतरही शिंदे यांच्या समर्थनात वाढ झाली आहे. तळकोकणातले आमदार दीपक केसरकरही एकनाथ शिंदे यांच्या गोटात सहभागी झालेत. या सगळ्या मोठ्या राजकिय घडामोडींवर भाजपचे प्रदेश सरचिटणीस रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खा.शरद पवार व काँगेसवर निशाणा साधला आहे.
आमदार मूळ घर सोडून गेले ते काँग्रेस व पवार साहेब नको. पन्नास वर्षांच्या राजकारणात त्यांनी हेच कमावले अशी बोचरी टीका निलेश राणे यांनी केली आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहलं की, ‘५० आमदार / मंत्री मूळ घर सोडून वेगळे झाले कारण त्यांना काँग्रेस आणि पवार साहेब नको. ५० वर्षाच्या राजकारणात पवार साहेबांनी हेच कमवलं’ शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
शिंदे यांच्या बंडाला ४८ तास उलटले आहेत. ४५ आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. काँगेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमधून बाहेर पडा असा थेट सल्लाच शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. महाविकास आघाडीत फक्त घटक पक्षांचा फायदा झाला शिवसैनिक भरडला गेला असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केल होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनीही काँग्रेस व राष्ट्रवादीवर निशाणा साधत शरद पवार यांच्यावर टिका केली आहे.