मुंबईत 3,879, पुण्यात 9,131 नवे रुग्ण; राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 48,80,542 वर
![Third wave inevitable in September-October; Delta patients found in Mumbai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/corona-3.jpg)
मुंबई – राज्यात कडक निर्बंध लावलेले असतानाही कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड झपाट्याने वाढतेय. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, वारंवार हात धुवणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रात बुधवारी दिवसभरात 57,640 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 920 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 57,006 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 48,80,542 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 72,662 इतका झाला आहे. त्याचबरोबर राज्यात आतापर्यंत 41,64,098 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सध्या 6,41,569 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मागील महिन्यात सलग पाच हजारांहून अधिक विक्रमी दैनंदिन रुग्णवाढ होत होती. मात्र २६ एप्रिलपासून दररोज ५ हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद होत असल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळत आहे. काल दिवसभरात मुंबईत 3,879 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 77 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 3,686 जणांनी कोरोनावर मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 6,65,299 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 13,547 इतका झाला आहे, तर आतापर्यंत 5,98,545 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 51,472 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
तसेच पुणे जिल्ह्यात बुधवारी 9,131 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 8,85,592 वर पोहोचली असून काल दिवसभरात 149 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा 13,826 इतका झाला आहे. तसेच पुण्यात काल 8,297 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आतापर्यंत एकूण 7,75,250 जण कोरोनामुक्त झाले आहेत.