PMPML च्या ३३७ बसेस कमी होणार!
![337 buses of PMPML will be reduced](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/PMPML--780x470.jpg)
पिंपरी : पीएमपीच्या ताफ्यातून आता ३३७ बस लवकरच बाद होणार असून, स्वमालकीच्या फक्त ६५४ बस राहणार आहेत. ठेकेदारांच्या बसगाड्या मिळून पीएमपीकडे सध्या २ हजार ८९ गाड्या आहेत. आता ३३७ गाड्या बाद केल्यावर ताफ्यात १७५२ गाड्या राहणार आहेत. त्यामुळे लोकसंख्येनुसार आवश्यक असलेल्या पुणेकरांसाठीच्या बसगाड्यांची तूट २ हजारांवर पोहोचणार आहे.
महापालिकेच्या सर्वंकष आराखड्यानुसार पुणेकरांना सध्या साडेतीन हजार बसगाड्यांची गरज आहे. मात्र, सध्या पीएमपीकडे स्वमालकीच्या आणि ठेकेदारांच्या मिळून २ हजार ८९ बसगाड्या आहेत. त्यातील पीएमपीच्या स्वमालकीच्या ९९१ तर ठेकेदारांच्या भाडेतत्त्वावरील १ हजार ९८ बस आहेत. त्यातील स्वमालकीच्या ३३७ बसचे आयुर्मान १० वर्षांपुढे गेले आहे, तर काहींचे संचलन ७ लाख किलोमीटरपेक्षा जास्त झाले आहे.
मागील चार महिन्यात २४४ बस झाल्या स्क्रॅप
पीएमपी प्रशासन बसचे आयुर्मान दहा वर्षांपेक्षा जास्त झाले किंवा संचलन सात लाख किलोमीटरपेक्षा अधिक झाले असेल तर त्या गाड्या बाद केल्या जातात. स्क्रॅप बसचा ई-लिलाव १३ डिसेंबर रोजी झाला आहे. यात ताफ्यातील २४४ बस लिलावात काढण्यात आल्यआ आहेत.
आमच्याकडील ३३७ बसगाड्यांचे आयुर्मान डिसेंबर २०२२ मध्ये संपलेले आहे. त्यामुळे या गाड्या आम्ही लवकरच ताफ्यातून बाद करणार आहे. नवीन गाड्यांची मागणी केली आहे, त्या लवकरच ताफ्यात येतील, असं पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी म्हटलं आहे.