अकोला शासकीय मेडीकल कॉलेजच्या डीनसह ३० डॉक्टरांना कोरोनाची लागण
![13 thousand 148 new patients, 302 deaths in the last 24 hours in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/corona-coronavirus-virus-5174671.jpg)
अकोला | प्रतिनिधी
अकोला शासकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर स्टाफ व अन्य आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यामध्ये मेडिकल कॉलेजच्या डीनसह शिकाऊ डॉक्टरांचा सुद्धा समावेश आहे. दरम्यान या सर्वांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणे असल्याने गृह विलगीकरणात त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचं कळतंय.
अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होते आहे. तिसऱ्या लाटेत काल दिवसभरात शहरात ९२ रुग्ण आढळले. या रुग्णांमध्ये मेडीकल कॉलेजच्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. रुग्णांना डिस्चार्ज देणे ते अनेक वैद्यकीय चाचण्यांकरता हे कर्मचारी थेट संपर्कात येत असतात.
याचदरम्यान या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. वाढती रुग्णसंख्या पाहून प्रशासनाने वारंवार नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क घालून जाण्याची विनंती केली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही अकोल्यात अशाच पद्धतीने रुग्णसंख्या वाढली होती. या पार्श्वभूमीवर लोकांनी काळजी घेण्याचं आवाहन सर्व आरोग्य यंत्रणांनी केलं आहे.