‘२०१९ ला पैसे घेऊन विधानसभेची उमेदवारी…’; शिंदेंच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/mahaenews-40-2-780x470.jpg)
मुंबई : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पैसे घेऊन उमेदवारी देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेनेचे (शिंदे गट) वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच वैजापूरमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटावर आणि स्थानिक आमदार रमेश बोरनारे यांच्यावर टीका केली होती. बोरनारे यांनी आज (१८ सप्टेंबर) वैजापुरात सभा घेऊन उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं.
हेही वाचा – पुण्यातील विसर्जन मिरवणुका 27 तास उलटूनही अद्यापही सुरूच, अनेक भागात वाहतूक कोंडी
रमेश बोरनारे म्हणाले, २०१९ च्या निवडणुकीत वैजापूर विधानसभेची उमेदवारी देत असताना पैशाचा वापर होणार होता. पैसे घेऊन वैजापूरची उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला गेला. एका माणसाला बळजबरीने पैशांच्या बदल्यात उमेदवारी दिली जाणार होती. उमेदवारी विकण्याचा घाट त्यांनी घातला होता आणि काल ते वैजापूरला येऊन माझ्यावर टीका करून गेले. ते म्हणाले, रमेश बोरनारेला उलटं टांगलं असतं. मात्र मी असं बोललो की आज जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते आणि त्यांनी तुम्हाला काँग्रेसबरोबर आघाडी करताना त्यांनी पाहिलं असतं तर त्यांनीच तुम्हाला उलटं टांगलं असतं.