ओळखीचा घेतला फायदा, २० वर्षीय तरुणीवर चालत्या वाहनात अतिप्रसंग; तिघांवर गुन्हा दाखल
![ओळखीचा घेतला फायदा, २० वर्षीय तरुणीवर चालत्या वाहनात अतिप्रसंग; तिघांवर गुन्हा दाखल](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/ओळखीचा-घेतला-फायदा-२०-वर्षीय-तरुणीवर-चालत्या-वाहनात-अतिप्रसंग-तिघांवर.jpg)
अकोला : रस्त्यावर झालेली ओळख एका २० वर्षीय तरुणीचं सर्वस्व हिरावून गेली. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्यातील माना येथील या तरूणीवर कंझरा रस्त्यावर वाहनात अतिप्रसंग करण्यात आला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मुर्तीजापुर शहर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड करण्यात आलं. या तिघांनाही न्यायालयाने २७ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
प्रवासी वाहकाशी झाली ओळख…
मिळालेल्या माहितीनुसार, वयाच्या १७व्या वर्षापासून अकोला जिल्ह्यातील माना येथील मुलगी शिक्षणासाठी मुर्तिजापूर येथे ये-जा करते. यादरम्यान, तिची ओळख प्रवाशी वाहून नेणारा मॅक्सीमा वाहनाचा चालक शेख मोहसीन शेख मन्नू याच्याशी झाली. त्याने याचा फायदा उचलत तिला शारीरिक सुखाची मागणी केली असता तिने स्पष्ट नकार दिला.
चालत्या वाहनात केला अतिप्रसंग…
दरम्यान, सदर मुलीला भेटण्याच्या अनुषंगाने २१ मे रोजी मुर्तिजापूर येथे बोलाविले. आपल्या तीन साथीदारांसोबत तिला एमएच ३७ जी ७८०८ क्रमाकांच्या मॅक्सीमा या वाहनात बसवून वाहन कंझरा रस्त्यावर नेले आणि चालत्या वाहनात शेख मोहसीन शेख मन्नू याने तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरी तिच्यावर अतिप्रसंग केला. या घटनेनंतर पीडित मुलीने मुर्तीजापुर शहर पोलीस ठाणे गाठले आणि घडलेल्या प्रकरणाची तक्रार दिली.
यांच्यावर झालेत गुन्हे दाखल…
शेख मोहसीन शेख मन्नू (वय २७, राहणार, माना, ता. मुतिजापुर, जि. अकोला.), सुमित गोंडणे (वय २१, राहणार, माना, ता. मुतिजापुर, जि. अकोला.) आणि कुणाल वासनिक (वय २७, राहणार, माना, ता. मुतिजापुर, जि. अकोला.) यांच्याविरुद्ध मुर्तीजापुर पोलीस ठाण्यात ३७६, ५०६, ३२३, ४३ सहकलम ३(१)(आर)(एस)(डब्लू) अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. लागलीच पोलिसांनी या तिघांनाही अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २७ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास मुर्तीजापुर शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.