राज्य सरकारने मेडिकलच्या परीक्षाही पुढे ढकलल्या
![The state government also postponed medical examinations](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/medical.jpg)
मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या वैद्यकीय परीक्षा जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येणार आहे.
वाचा :-कोरोनाच्या निर्बंधांमुळे ताडी व्यावसायिक आर्थिक विवंचनेत
परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना अमित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पुढील ७२ तासांत निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. अमित देशमुख यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली. ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत १९ एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या चर्चेनंतर जूनमध्ये घेण्यात येणार आहेत. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल. या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे’, असे ट्विट अमित देशमुख यांनी केले आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत 19 एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मा. मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) April 15, 2021
दरम्यान, कोरोनाचा कहर वाढत असताना वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी सर्व स्तरातून केली जात होती. यानंतर अमित देशमुख यांनी ७२ तासांत यासंबंधी निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही, मात्र विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल, मुख्यमंत्री, नॅशनल मेडिकल कौन्सिल, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्याशी चर्चा करून परिक्षांसंदर्भात पुढील ७२ तासात निर्णय घेऊ, असे ते म्हणाले होते.