सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे रक्षाबंधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Ajit-Pawar-Supriya-Sule-Rakshabandhan.jpg)
मुंबई | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ही महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध भावंडे. दरवर्षीप्रमाणे या भावंडांनी रक्षाबंधनाचा सण घरच्या घरी उत्साहात साजरा केला. सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ परिसरातील शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार यांना राखी बांधली. यावेळी शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुळे कुटुंबीय उपस्थित होते.
सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर रक्षाबंधनाचे लाईव्ह शेअर केले आहे. सुप्रिया सुळे यांचे लाडक्या दादावरील प्रेम सर्वश्रुत आहे. पवार कुटुंबीय दरवर्षी एकत्र जमून मोठ्या प्रमाणावर रक्षाबंधन, भाऊबीज यासारखे सण-उत्सव साजरे करतात. यंदा मात्र कोरोनामुळे त्याला कात्री लावावी लागली. अजित पवार यांच्या वाढदिवशी सर्व बहिणींनी त्यांचे ऑनलाईन औक्षण केले होते.
“कोरोना काळात अनेक महिला डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, अंगणवाडी ताई, आशा ताई, महिला पोलीस असा मोठा भगिनीवर्ग जीवाची जोखीम पत्करुन समाजातील इतर भावांच्या रक्षणासाठी लढत आहे. त्यांच्या शौर्य, त्याग, समर्पणाबद्दल आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी कृतज्ञ राहिलं पाहिजे” अशा भावना अजित पवार यांनी सकाळीच ट्विटरवरुन व्यक्त केल्या होत्या.