“सीए’ परीक्षेत 9 हजार 243 उमेदवार यशस्वी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/ca-result-67.jpg)
- नवीन अभ्यासक्रमात प्रित शाह; तर जुन्या अतुल अगरवाल देशात प्रथम
पुणे – सनदी लेखापाल (सीए) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यात यशस्वी झालेल्या 9 हजार 243 उमेदवारांना सनदी लेखापाल अशी ओळख मिळणार आहे. सीएच्या अंतिम निकालात जुन्या अभ्यासक्रमांनुसार 9 हजार 104, तर नवीन अभ्यासक्रमानुसार 139 उमेदवार सीएसाठी पात्र ठरले आहेत.
सीए अंतिम परीक्षेचा निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर झाला. यंदा पहिल्यादांच नवीन आणि जुन्या अभ्यासक्रमानुसार दिलेल्या दोन्ही पद्धतीचा स्वतंत्रपणे निकाल जाहीर करण्यात आला. नवीन अभ्यासक्रमानुसार दिलेल्या परीक्षेच्या पहिल्या ग्रुपचा निकाल 11.36 टक्के, तर दुसऱ्या ग्रुपचा निकाल 7.95 टक्के एवढा लागला आहे. एकून 139 उमेदवार सीए झाले आहेत. दरम्यान, सुधारित अभ्यासक्रमाच्या निकालात सुरतचा प्रित शाह हा देशात पहिला आला आहे. त्यानंतर बेंगळुरुचा अभिषेक नागराज दुसरा, तर उल्हासनगर येथील समीक्षा अगरवाल हिने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
जुन्या अभ्यासक्रमानुसार दिलेल्या सीए परीक्षेच्या ग्रुप एकचा निकाल 16 टक्के, तर ग्रुप दोनचा निकाल 13.59 टक्के इतका लागला आहे. या परीक्षेत 9 हजार 104 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत जयपूरचा अतुल अगरवाल हा देशात प्रथम आला आहे. अहमदाबादचा आगम संदीपभाई हा दुसरा, तर सुरतचा अनुराग बागरिया हा तिसरा क्रमांक पटकाविला.
सीपीटीचा निकाल
चार्टर्ड अकाउंटंटसाठी (सीए) घेतल्या जाणाऱ्या “कॉमन प्रॉफिशिअन्सी टेस्ट’ अर्थात सीपीटीचा निकाल जाहीर झाला. ही परीक्षा जून महिन्यात घेण्यात आली होती. एकूण 54 हजार 474 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 15 हजार 284 विद्यार्थी उत्तीर्ण ठरले असून, उत्तीर्णांची टक्केवारी 28.06 टक्के इतकी आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 27.93 टक्के, तर मुलींचे 28.21 टक्के आहे.
सीएच्या फाउंडेशनचा निकाल
सीएसाठी घेण्यात येणाऱ्या फाउंडेशन परीक्षेचा निकालही शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेला एकूण 6 हजार 315 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 1 हजार 215 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णांची टक्केवारी 19.24 एवढी आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 17.59 टक्के, तर मुलींचे प्रमाण 21.86 टक्के एवढे आहे. फाउंडेशनच्या निकालात देशात दिल्लीची स्वाती प्रथम, रायपुरमधील आयुष अगरवाल दुसरा आणि हल्दवानी येथील स्वलेहा साजीद हा तिसरा क्रमांक पटकाविला आहे.