breaking-newsपुणेमहाराष्ट्र

सिमेंट रस्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याची नासाडी!

शहरात पाणीटंचाईसदृश स्थिती असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचा सल्ला देणारी महापालिका सिमेंट रस्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करत असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. पाणीटंचाईतही पिण्याचे पाणी वापरून सिमेंटचे रस्ते करण्याचा धडाका कायम राहिला आहे. सिमेंट रस्त्यांसाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करावा, असा आदेश असतानाही पाणीपुरवठा विभाग आणि पथ विभागाकडून याबाबत एकमेकांकडे बोट दाखविण्यात येत आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पातील चारही धरणात मिळून एकूण ३.३१ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा आहे. धरणातील हे पाणी ३१ जुलैपर्यंत पुरवावे लागणार आहे. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरावे, असा सल्ला महापालिकेकडून दिला जात आहे. पाण्याची ही परिस्थिती असतानाही सर्वपक्षीय नगरसेवकांकडून मात्र गल्लीबोळात सिमेंट काँक्रिटचे रस्ते करण्याचा धडाका कायम राहिला असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच महापालिकेच्या स्थायी समितीने रस्ते काँक्रिट करण्याच्या प्रस्तावांना मान्यता दिली आहे. त्याची कामे वेगात सुरू आहेत.

धरणातील पाणीसाठा कमी असल्यामुळे नव्याने काँक्रिटीकरणाच्या कामांना मंजुरी देण्यात येऊ नये, असे कार्यालयीन परिपत्रक महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी काढले होते. मात्र सर्वपक्षीय नगरसेवकांच्या दबावामुळे मंजुरी मिळालेल्या रस्त्यांची कामे करावीत आणि त्यासाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरावे, असा आदेश सौरभ राव यांनी दिला. मात्र त्यानंतरही पथ विभागाकडून प्रक्रिया केलेले पाणी वापरले जात नसल्याचे पुढे आले आहे. पिण्याचे पाणी वापरून सिमेंट रस्ते तयार केले जात असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग आणि पथ विभागाकडून एकमेकांकडे बोट दाखविण्यात येत आहे.

शहरात प्रतिदिन ७४४ दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते. त्यापैकी ४५० दशलक्ष लिटर पाण्यावर सांडपाणी शुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. महापालिकेच्या उद्यान, बांधकाम आणि पथ विभागाने हे पाणी वापरावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असा दावा पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

सिमेंट रस्त्यांची कामे मोठय़ा प्रमाणावर सुरू असल्याचे मान्य करतानाच त्यासाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरावे, अशा सूचना संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिल्याचे पथ विभागाकडून सांगण्यात आले. प्रक्रिया केलेले पाणी वापरावे, असा दावा महापालिकेचे दोन्ही विभाग करत असले, तरी प्रत्यक्षात प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर होत आहे का, हे सांगण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.

काँक्रिटीकरणाचा धडाका

पाणीटंचाई आणि सिमेंट रस्त्यांमुळे भूर्गात पाणी मुरण्यास अडथळा निर्माण होत असताना गल्लीबोळात काँक्रिटीकरणाचा धडाका कायम राहिला आहे. क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून सिमेंट रस्ते करण्यासाठीच्या निविदा प्रशासनाकडून मागविण्यात आल्या आहेत. कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत किष्किंधानगर, जयभवानी नगर, म्हातोबा- मोरे वसाहत, केळेवाडी आणि हनुमाननगर परिसरात पुढील सहा महिन्यांत रस्ते सिमेंटचे करण्यात येणार आहेत. याशिवाय अन्य क्षेत्रीय कार्यालयांकडून येत्या काही दिवसांत या संदर्भात निविदा काढण्यात येणार आहेत.

प्रक्रिया केलेल्या पाण्याबाबत शंका

सिमेंट रस्त्यांसाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर केल्यास रस्त्यांच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम दिसून येतो, असे निरीक्षण भूजल तज्ज्ञांकडून नोंदविण्यात आले आहे. प्रक्रिया केलेले पाणी वापरायचे झाल्यास प्रक्रिया केलेल्या पाण्याची गुणवत्ता उच्च दर्जाची असणे अपेक्षित आहे. महापालिकेच्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पात प्रक्रिया होत असलेल्या पाण्याबाबतच शंका व्यक्त होत आहे.

धरणातील पाणीसाठा कमी असताना आणि एकदिवसाआड पाणीपुरवठय़ाची परिस्थिती ओढवली असताना सिमेंट रस्त्यांचा हव्यास कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाणीटंचाईच्या काळात सिमेंटचे रस्ते करण्याची कामे थांबविणे अपेक्षित आहे. आवश्यकता किंवा मागणी नसतानाही सिमेंट रस्त्यांच्या नावाखाली कोटय़वधींची उधळपट्टी होत आहे.

– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button