सागरी किनारी रस्त्यावर ‘क्रॅश एटोनेटर’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/costal-road-1.jpg)
आंतरबदलांच्या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा
मुंबई सागरी किनारी रस्त्यावर (कोस्टल रोड) मार्ग बदल करण्यासाठी ३ ठिकाणी आंतरबदल करण्याची सुविधा असून या रस्त्यांवरील भरधाव वाहनांचा अपघात झाल्यास प्रवाशांना दुखापत आणि वाहनांचे नुकसान होऊ नये यासाठी ‘कॅ्रश एटोनेटर’ यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
आंतरबदलांमधील प्रत्येक पर्यायी मार्गावर वाहन वेगमर्यादा ४० कि.मी प्रति तास ठेवावी लागणार आहे. तर कोस्टल रोडवरून आंतरबदलांमध्ये जाण्यासाठी किंवा आंतरबदलांमधून बाहेर येताना, वाहन ज्या ठिकाणी मार्ग बदलेल, त्या ठिकाणी अत्याधुनिक प्रकारचे क्रॅश एटोनेटर बसविण्यात येणार आहेत. यावर वाहन आदळल्यास स्प्रिंग अॅक्शनने वाहन व वाहनातील प्रवाशांना इजा पोहोचणार नाही.
दक्षिण मुंबईतील शामलदास गांधी मार्ग(प्रिन्सेस स्ट्रीट) ते राजीव गांधी सागरी सेतू (वरळी- वांद्रे सी लिंक) यांना जोडणारा ९.९८ कि.मी. लांबीचा सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) मुंबई महापालिका बांधणार आहे. देशातील या प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे. यासाठी कंत्राटदार आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांना काम देण्यात आले आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना अधिक सुलभतेने रस्त्याचा वापर करता यावा यासाठी रस्त्यावरून बाहेर पडताना व प्रवेश करताना महत्त्वाच्या अमरसन्स उद्यान, हाजीअली व वरळी सी फेस या ३ ठिकाणी आंतरबदल प्रस्तावित केले आहेत. या आंतरबदलांमधील मार्गबदल पर्यायांची एकूण संख्या १८ आहे. यामध्ये ९ पर्याय हे सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांवरून सागरी किनारा रस्त्यावर प्रवेश करण्यासाठी आहेत. तर उर्वरित ९ पर्याय सागरी किनारा रस्त्यावरून बाहेर पडण्यासाठी असतील. सागरी किनारा रस्त्याच्या आंतरबदलांमधील प्रत्येक पर्यायी रस्त्यावर ३ मार्गिका असतील. यापैकी २ मार्गिका या प्रत्येकी ३.५ मीटर रुंदीच्या असतील. तर तिसरी २.२५ मीटर रुंदीची मार्गिका ही आपत्कालीन परिस्थिती दरम्यान वापरासाठी असतील.
‘स्प्रिंग अॅक्शन’ यंत्रणा
आंतरबदल सुविधांमध्ये एकूण १८ मार्गबदल पर्याय असतील, असे ‘मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मोहन माचीवाल यांनी स्पष्ट केले. यापैकी ९ पर्याय कोस्टल रोडवर प्रवेश करण्यासाठी, तर ९ पर्याय हे या रस्त्यावरून बाहेर पडण्यासाठी असतील, असेही माचीवाल यांनी स्पष्ट केले. कोस्टल रोडवरून आंतरबदलांमध्ये जाण्यासाठी किंवा आंतरबदलांमधून बाहेर येताना, वाहन ज्या ठिकाणी मार्ग बदलेल, त्या ठिकाणी अत्याधुनिक प्रकारचे क्रॅश एटोनेटर बसविण्यात येणार आहेत. यावर वाहन आदळल्यास स्प्रिंग अॅक्शनने वाहन व वाहनातील प्रवाशांना इजा होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.