साखरपुडा कार्यक्रमासाठी निघालेल्या कुटुंबियांच्या बसला भीषण अपघात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/अपघात.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
साखरपुडा कार्यक्रमासाठी निघालेल्या खासगी बसला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील किवळे एक्झिटजवळ रविवारी दुपारी बाराच्या सुमारास भीषण अपघात झाल्याचं समजतंय. या अपघातात 25 जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
प्रत्यक्षदर्शी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 40 प्रवासी घेऊन जाणारी भरधाव बस रस्त्याच्या कडेला पलटली. चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं बस उलटली आणि बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात 25 जण जखमी झाले आहेत. जखमींना महामार्गालगतच्या हॉस्पिटलमध्ये तातडीनं दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर बसचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी ही बस शहापूरहून (मुंबई) सांगलीकडे निघाली होती, अशी माहिती मिळाली आहे.
अपघातानंतर महामार्ग पोलीस, देहू रोड पोलीस, देवदूत यंत्रणा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मदतकार्य सुरू केलं आहे. जखमींना महामार्गालगतच्या तीन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.