सरकारच्या कारभाराला कंटाळूनच पोलीस महासंचालक गेले, फडणवीसांचे टीकास्त्र
![Tired of the government's work, the Director General of Police went, Fadnavis's Tikastra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/devendra-fadnavis-6.jpg)
नागपूर – मागील काही महिन्यात पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल ठाकरे सरकारवर नाराज असल्याचे सांगितले जाते. आता जयस्वाल यांची सीआयएसएफ म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालपदी नियुक्ती झाली आहे. जयस्वाल हे केंद्रात गेल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
सरकारच्या कारभाराला कंटाळूनच महासंचालकांनी प्रतिनियुक्ती स्वीकारली, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केली आहे.
वाचा :-गृहमंत्र्यांनी पुणे पोलिसांसोबत केक कापत केले नवीनवर्षाचे स्वागत
फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी देखरेखीचे काम करणं अपेक्षित असतं. मात्र बदलीपासून प्रत्येक गोष्टीमध्ये सध्या हस्तक्षेप होताना दिसत आहे. त्यामुळे सरकारच्या कारभाराला कंटाळूनच महासंचालकांनी प्रतिनियुक्ती स्वीकारली आहे.
राज्यात पहिल्यांदाच पोलीस महासंचालकांना विश्वासात न घेता पोलीस विभागाचा कारभार चालला आहे. त्यामुळेच सुबोध जैस्वाल यांनी नाराज होऊन प्रतिनियुक्ती मागितली होती. ती केंद्र सरकारने स्वीकारली आहे. यामुळे राज्य सरकारने समजून घेतलं पाहिजे की पोलिसिंग गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येत असलं, तरीही पोलीस विभागाला स्वायत्तता दिली आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.
वाचा :-‘आता बघूच… बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की सत्तेची लाचारी’, राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
राज्यात पहिल्यांदाच असं घडलंय की सरकारच्या कारभाराला कंटाळून पोलीस महासंचालक गेले. पोलीस विभागाच्या मनोबलावर याचा परिणाम होईल, असे म्हणत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.