सरकारचा काहीही भरवसा नाही, मतदान यंत्राची तपासणी करावी – शरद पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/WhatsApp-Image-2019-02-13-at-1.49.43-PM.jpeg)
बीड – “सरकारचा काहीही भरवसा नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी सर्व बूथप्रमुखांनी सकाळी सहालाच मतदान केंद्रावर जाऊन प्रथम मतदान यंत्रांची तपासणी करावी,’ असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बूथ प्रमुखांना दिला आहे. पक्षातर्फे लोकसभेसाठी बीडचा उमेदवार चार दिवसांत कळवू, असेही त्यांनी सांगितले.
शरद पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील बूथ प्रमुख, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. केंद्रात कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना हाती घेतल्या. त्या वेळी शेतकऱ्यांसाठी 72 हजार कोटींची कर्जमाफी केली. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण घटण्यास मदत झाली. सध्याच्या सरकारने जाचक अटी लादल्याने कर्जमाफीचा लाभ निम्म्याही शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढतच आहेत, असे पवार म्हणाले.