सज्जन माणसे माहितीविना आरोप करत नाहीत; मुख्यमंत्र्यांचा पृथ्वीराज चव्हाणांवर हल्ला
नागपूर: “बाबा तुम्हाला अनेकवेळा माहित नसते, कुणाचेही ऐकून, माहिती न घेता आरोप करता. सज्जन माणसे असे करत नसतात, माहिती घ्या आणि आरोप करा,” असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केला.
सिडकोच्या जमीन घोटाळ्याच्या विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत उत्तर दिले. जमीन व्यवहाराचे अधिकार पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, त्यामुळे त्याचा मंत्र्यांशी किंवा मंत्रालयाशी संबंध नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मी राजीनामा देणार नाहीच, पण माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कथित सिडको जमीन घोटाळाप्रकरणी न्यायालयीन चौकशीची घोषणा केली. त्याबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातील 200 सात बारा प्रकरणीही चौकशी होणार आहे.
तुमच्या सरकारने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना जमिनीचे अधिकार दिले. त्यामुळे ज्यांना जमिनी दिल्या त्यांनी जमिनी विकून टाकल्या. जर चौकशीच करायची झाली तर पृथ्वीराज चव्हाणांपासून, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे या सगळ्यांचे राजीनामा मागावे लागतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.