संरक्षक भिंती जिवावर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/mv04rr.jpg)
मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये इमारतींच्या संरक्षक भिंती कोसळण्याच्या प्रकारात वाढ झाली असून या भिंती मृत्यूचे सापळे बनू लागल्या आहेत. बहुमजली इमारतींचे बांधकाम, दुरुस्तीसाठी पदपथांवर केले जाणारे खोदकाम, विकासकामे आणि देखभालीचा अभाव अशा विविध कारणांमुळे संरक्षक भिंती धोकादायक बनल्या आहेत.
मुलुंडमधील शास्त्रीनगरमध्ये २०१६ मध्ये संरक्षक भिंत कोसळून एका तरुणाला प्राण गमवावे लागले, तर १६ जण जखमी झाले. जोगेश्वरीतील बेहरामबाग परिसरातील बहुमजली इमारतीची संरक्षक भिंत २०१८ मध्ये कोसळली, पण सुदैवाने जीवितहानी झाली नाही. तर तीन दिवसांपूर्वी घाटकोपर आणि विक्रोळीमध्येही इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. घाटकोपरच्या दुर्घटनेत तीन-चार वाहनांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. मात्र विक्रोळीतील घटनेत सुदैवाने कुणीही दगावले नाही वा जखमीही झाले नाही. इमारतीची संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वाढ झाली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत मोठय़ा प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. काही ठिकाणी पदपथांची वारंवार दुरुस्ती करण्यात येते. त्याचबरोबर सेवा उपयोगिता कंपनीच्या कामांसाठीही रस्त्यासह पदपथांवर खोदकाम केले जाते. त्याचबरोबर चाळीच्या पुनर्विकासाचे प्रकल्प मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. या कामांचा फटका लगतच्या इमारतींच्या संरक्षक भिंतींना बसून त्या कमकुवत बनत असल्याचे निदर्शनास आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बहुसंख्य इमारतींमधील रहिवाशांचे संरक्षक भिंतींकडे लक्षच नसते. इमारतीप्रमाणेच संरक्षक भिंतींचीही वेळोवेळी दुरुस्ती करणे गरजेचे आहे. एकदा का संरक्षक भिंत बांधली की नंतर त्याकडे लक्षच दिले जात नाही. डागडुजी होत नसल्यामुळे पावसाळ्यात संरक्षक भिंतीचा भाग कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे.
अनेक ठिकाणी इमारतीच्या संरक्षक भिंतीचा आधार घेऊन पदपथांवर झोपडय़ा उभारण्यात आल्या आहेत. झोपडय़ांमध्ये वास्तव्य करणारे रहिवाशी संरक्षक भिंतीला खिळे ठोकून फडताळी तयार करीत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळेही संरक्षक भिंती कमकुवत बनत आहेत.
टेकडय़ांवरून दरड कोसळू नये यासाठी पालिकेने काही ठिकाणी संरक्षक भिंतींचे कवच उभे केले आहे. मात्र या भिंतींच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे.