संपात सहभागी न झालेल्या ओला चालकाला बेदम मारहाण आणि उठाबशांची शिक्षा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/Ola-Pune-driver-beaten-2.jpg)
गेल्या आठ दिवसांपासून विविध मागण्यांसाठी संपावर असलेल्या ओला-उबेरच्या चालकांनी संपात सहभागी न झालेल्या एका चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. केवळ त्याला मारहाण करुन ते थांबले नाहीत तर कपडे उतरवून त्याला उठाबशा देखील काढायला लावल्या. त्यानंतर या मारहाणीचा व्हिडीओ बनवून व्हायरल करण्यात आला होता. पुण्यातील एक चालक मुंबईत भाडं घेऊन आल्यानंतर त्यांच्यासोबत ही मारहाणीची घटना घडली.
शुक्रवारी भांडूपमध्ये ही घटना घडली आहे. पुण्यातील चालक संताजी पाटील हे भाडे घेऊन मुंबईत आले असताना भांडूप येथे संपात सहभागी झालेल्या काही ओला-उबेरच्या चालकांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर चालक पाटील हे तेथून पुण्यात परतले होते, पण त्यांच्या मित्रांनी मारहाणीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर पाटील यांना घेऊन सोमवारी पुन्हा भांडूप गाठलं आणि पोलीस स्थानकात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर व्हिडीओ पाहून आम्ही आरोपींचा शोध सुरू केला होता, त्यानुसार तातडीने चार जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती मिड-डेशी बोलताना भांडूप पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खाडे यांनी दिली.
मारहाण करणारे आंदोलक स्वतः ओला-उबेर ची बुकिंग करुन, जी गाडी येईल तिच्या चालकांना मारहाण करीत होते. अशाच प्रकारे पुण्यावरून मुंबईत आलेल्या संताजी यांना देखील त्यांनी गाठले. त्यांना भांडूपच्या अमरनगर भागात एका कार्यालयात घेऊन जाऊन तिथे त्याला हाताने आणि पट्ट्यांनी मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे.