शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप भाजपात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/balasaheb-sanap-1.jpg)
नाशिक – शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुन्हा एकदा पक्षांतर करत भाजपात प्रवेश केला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सानप यांनी आज कमळ हाती घेतले. नाशिक महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
‘दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर थोडसं चुकल्यासारखं वाटतं. यावर चंद्रकांत पाटील आणि इतर नेत्यांनी समजून घेत पक्षात पुन्हा प्रवेश दिला’, अशी भावना यावेळी सानप यांनी व्यक्त केली. तर ‘पक्षापासून दूर गेलेले सानप आज पुन्हा एकदा भाजपात परतले आहे. कुंभमेळ्यांच्या वेळी सानप यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं. सगळ्या अडचणी दूर करत कुंभमेळा चांगल्या प्रकारे पाडला होता. सानप हे जमिनीशी जोडलेले नेते आहेत. कुणीही वाद करण्याचं कारण नाही. जुने-नवे अशी कोणतीही अडचण येणार नाही. आपल्याला पक्ष मजबूत करायचा आहे. नाशिक भाजपाचा बाल्लेकिल्ला झाला आहे. त्याच ताकदीने पक्ष मजबूत करायचा आहे’, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच ‘एकत्र काम करणारी माणसं फार काळ लांब राहू शकत नाहीत. केवळ सत्ता नाही तर विचाराने एकत्र काम करणारी माणसं फार काळ लांब राहू शकत नाहीत. त्यामुळे बाळासाहेब सानप परत पक्षात आले’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.