शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणा, 50 जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/7-2.jpg)
मुंबई |महाईन्यूज|
मुंबईतल्या आझाद मैदानावर शरजील इमाम यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. आता या घोषणाबाजी विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. इमामच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्याविरूद्ध आझाद मैदान पोलीस स्थानकात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तब्बल 50 ते 60 जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
सामाजिक कार्यकर्त्या उर्वशी चूडावाला आणि इतर 50 जणांवर कलम 124 ए, 153 बी, 505, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कार्यक्रमाच्या आयोजकांनी सदर घोषणाबाजी करणारा गट आपल्या परिचित नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.
तर या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल होताच कार्यक्रमाच्या आयोजकांनी आपला याच्याशी काही संबंध नसून अशा प्रकराच्या घोषणाबाजीचा आपण निषेध करतो, असं म्हटलं आहे. घोषणाबाजी करणारा वादग्रस्त व्हिडिओ समोर आल्यानंतर क्यूएएमच्या आयोजन समितीने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटलं की, आम्ही यापासून स्वत: ला पूर्णपणे वेगळे करतो आणि कडक शब्दांत कट्टर घोषणाबाजी करणाऱ्यांचा निषेध करतो. कार्यक्रमाच्या वेळी भारताच्या अखंडतेविरूद्ध केलेल्या कोणत्याही निषेधाचा आम्ही निषेध करतो.