वीर जवान यश देशमुख यांना साश्रू-नयनांनी अखेरचा निरोप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/YashDeshmukhTwitter.jpg)
जळगांव – श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले वीर जवान यश देशमुख यांच्यावर आज शासकीय इतमामात व अत्यंत शोकाकूल वातावरणात चाळीसगाव तालुक्यातील पिपळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारोंच्या जनसमुदायाने साश्रू-नयनांनी या वीर जवानाला अखेरचा निरोप दिला.
जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे २६ नोव्हेंबर रोजी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. या घटनेत जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव येथील यश देशमुख हे जवान शहीद झाले होते. आज या वीर जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यश देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कालच गावाजवळच्या माळरानावरील जमिनीची साफसफाई करण्यात आली होती. आज सकाळपासूनच पिंपळगावात लोकांनी रांगोळ्यांनी रस्ते सुशोभीत करून आपल्या वीर सुपुत्राला निरोप देण्याची तयारी केली. ठिकठिकाणी फलकांच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
आज सकाळी नाशिक येथून यश देशमुख यांचे पार्थिव घरी आले तेव्हा कुटुंबियांचा आक्रोश पाहून वातावरण भावविवश झाले. सजवलेल्या वाहनावरून त्यांचे पार्थिव नेण्यात आले. तेव्हा जोरदार घोषणांनी वातावरण भारावून निघाले. त्यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकूल वातावरणात आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, कृषी मंत्री दादा भुसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी सभापती पोपट भोळे यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, लष्करी व पोलिस जवान तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.