विरोधकांची महाआघाडी हा मोठा भ्रम!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/Amit-Shah-1-1-1.jpg)
अमित शहा यांची टीका; भाजप-सेना युती होण्याचा विश्वास
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या विरोधात गेले असले तरी आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रात भाजपचेच सरकार येईल. विरोधकांची महाआघाडी हा एक मोठा भ्रम आहे, असा दावा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी मुंबईत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना केला. शिवसेनेने अद्याप युतीचा निर्णय घेतला नसला तरी निवडणुकीत शिवसेना भाजपसोबतच राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात शहा यांनी सध्याच्या राजकीय स्थितीचा आढावा घेतला. युतीबाबत शिवसेनेशी चर्चा सुरू आहे. अद्याप शिवसेनेने युतीचा निर्णय घेतलेला नसला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना आमच्यासोबत येईल. भाजप-शिवसेना युती निश्चितच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील निकाल भाजपच्या बाजूने नाहीत. पण या निकालांचा संबंध आगामी लोकसभा निवडणुकीशी जोडणे योग्य ठरणार नाही. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या मुद्दय़ांवर लढल्या जातात. त्यामुळे २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपचाच विजय होईल, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला. आगामी लोकसभा निवडणुकीत हिंदी भाषिक पट्टय़ात आणि इतरही राज्यांत भाजपचा विजय होईल, असे शहा यांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षांत भाजपने राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी केलेली कामे, भ्रष्टाचाराला घातलेला आळा, अडीच कोटी घरांना वीजजोडणी, आठ कोटी घरांना स्वच्छतागृह यासारख्या भाजप सरकारच्या कामगिरीवर लोकसभा निवडणूक लढवली जाईल. केंद्रात एक मजबूत सरकार असणे ही भाजपची नाही तर देशाची गरज आहे, असेही अमित शहा म्हणाले.